Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोलीस निरीक्षक विकास धस सीआयडीच्या ताब्यात
ऐक्य समूह
Saturday, August 12, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 11 : करमाळा येथील रावसाहेब जाधव खून प्रकरणातील संशयित तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस यांना शुक्रवारी गुप्तचर विभागाच्या पथकाने (सीआयडी) ताब्यात घेवून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सोमवार, दि. 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की एका खासगी बसमधून 77 लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मे 2016 मध्ये प्रवासावेळी कराड येथे घडली होती. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपासी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस हे काम पाहत होते. या प्रकरणातील संशयितांची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत कांकडकी यांच्यासह सहा कर्मचारी संशयित रावसाहेब जाधव याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल दशरथ डिकोळे (वय 36 वर्षे) रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर याला ताब्यात घेऊन कराड येथे आले होते. दि. 18 जून 2016 रोजी तपासकामी त्या दोघांना घेऊन पोलीस कार्वे नाका चौकीत आणले असता त्या ठिकाणी रावसाहेब जाधव याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झाला.      
रावसाहेब जाधव याचा मृत्यू झाल्याचे समजताच करमाळासह विविध ठिकाणावरुन जमलेल्या समाजबांधवांनी पोलीस ठाण्यात जमाव करुन संबंधित पोलिसांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्याचबरोबर कराड तहसील कार्यालयावरही मोर्चा काढला.
त्या प्रकरणात त्याचे मेहुणे अनिल डिकोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला व पोलीस अधीक्षकांनी निरीक्षक धस यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित केले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास राज्य गुप्तचर विभाग करत आहे. डिकोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यात पोलीस निरीक्षक धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांकडकी यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला होता. पण या प्रकरणातील सर्व संशयित पोलीस काही दिवस फरार होते. या प्रकरणात पहिल्यांदा पोलीस हवालदार कृष्णा खाडे याला सीआयडीने अटक केली. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कांकडकी  यांच्यासह दहा पोलीस न्यायालयात हजर झाले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यातील काही जणांची जामिनावर मुक्तताही झाली आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विकास धस यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी वरिष्ठ न्यायालयात प्रयत्न केले. त्याशिवाय फिर्यादीला आव्हान देणारी याचिकाही दाखल केली होती. अखेर गुरूवारी या प्रकरणात ते स्वत:हून येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. गोगले यांच्यासमोर हजर झाले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.  प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी गुप्तचर विभागाच्या पथकाने (सीआयडी) पोलीस निरीक्षक विकास धस यांना न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेऊन अटक करुन न्यायालयात हजर केले असता सोमवार, दि. 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: