Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने महिलेचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: re1
दोन मुलांना उपचारासाठी पुण्याला हलविले
5वडूज, दि. 10 :वडूज, ता. खटाव नगरपंचायतीच्या नियोजन समितीचे सभापती डॉ. महेश गुरव यांच्या पत्नी सौ. सारिका गुरव (वय 40) यांचा आज सकाळी मृत्यू झाला. सौ. गुरव यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने झाल्याची चर्चा आहे. डॉ. गुरव यांचा मुलगा सोहम (वय 12) व मुलगी अनुष्का (वय 15) हेदेखील आजारी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, सौ. गुरव या गेल्या काही दिवसांपूर्वी थंडी-तापाने त्रस्त होत्या. त्यांचा मुलगा सोहम व मुलगी अनुष्का हे देखील तापाने त्रस्त होते. या तिघांवरही वडूज येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सारिका गुरव यांची प्रकृती गुरुवारी अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातार्‍याला नेण्यात येत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर रात्री उशिरा वडूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सारिका गुरव यांच्या निधनाने खटाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू
दरम्यान, स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोन रुग्ण सांगलीचे होते.
आतापर्यंत 37 जणांना स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर उपचार यशस्वी उपचार झाले आहेत. जिल्ह्यात तापाने आजारी असलेल्या 135 रुग्णांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. 
मात्र, 98 रुग्णांमध्ये स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली नाहीत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: