Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डोकलामबाबत चीनचा दावा भूतानने फेटाळला
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: mn1
चीन आणि भारताकडून लष्करी बळकटीकरण सुरूच
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : डोकलाम भाग हा आमचाच भाग असून भूताननेही ते मान्य केले आहे, हा चीनचा दावा भूतानने स्पष्टपणे फेटाळला आहे. त्यामुळे डोकलाम भागात भारताची बाजू वरचढ झाली आहे. दरम्यान, या भागात गेले दोन महिने भारत आणि चिनी सैन्यात सुरू असलेला संघर्ष अजूनही निवळलेला नसून दोन्ही देशांनी सिक्कीम क्षेत्रात लष्करी कुमक वाढवून आपापल्या स्थानांचे मजबुतीकरण करणे सुरूच ठेवले आहे. मात्र, सीमा भागातील गावांमधील लोकांचे स्थलांतर करण्यात आले नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.
चीनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी वाँग वेनली यांनी डोकलामवरील चीनचा हक्क भूताननेही मान्य केल्याचे वक्तव्य बुधवारी केले होते. मात्र, या वक्तव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणतेही पुरावे दिले नव्हते. चीनचा हा दावा भूतानने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. भूतान सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे. डोकलाम प्रश्‍नी आमची भूमिका स्पष्ट आहे. हा भाग आमच्याच सार्वभौम हद्दीतील आहे. हा भाग आमचा असल्याचा चीनचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. या संदर्भात भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर 29 जून रोजी केलेले निवेदन आमची भूमिका स्पष्ट करणारे आहे, असे भूतानच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
डोकलाम भागात चीनने सुरू केलेली रस्तेबांधणी भूतानच्या हद्दीत आहे. चीनची ही कृती द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करणारी असून दोन्ही देशांमधील सीमा निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेतील अडथळा आहे, असे भूतानने प्रसिद्धीस दिलेल्या या पत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे. चीनच्या लष्कराने 16 जूनपासून डोकलाम येथील डोकालापासून भूतानच्या सैन्याच्या झोम्पेलरी या तळापर्यंत रस्तेबांधणी सुरू केली होती. दोन्ही देशांमध्ये सीमावादावर राजनैतिक माध्यमातून बोलणी सुरू आहेत. 1988 आणि 1998 मध्ये दोन्ही देशांनी सीमेवर शांतता आणि स्थैर्य टिकवण्याचे करार केले आहेत. दोन्ही देशांमधील सीमावादात अंतिम तोडगा निघेपर्यंत या करारानुसार काम करण्याचे धोरण दोन्ही देशांनी मान्य केले आहे, असे भूतानने म्हटले आहे. 16 जूनपूर्वी डोकलाम भागात जी स्थिती होती, तीच स्थिती चीनकडून कायम ठेवण्यात येईल, अशी आशाही भूतान सरकारने व्यक्त केली आहे. 
डोकलाम येथील रस्तेबांधणीवरून भूतानने आक्षेप घेतल्याचे चीनच्या राजनैतिक अधिकारी वाँग वेनली यांनी सुरुवातीला मान्य केले होते. मात्र, नंतर आपली भूमिका बदलताना डोकलाम हा भाग आपला नसल्याचे भूतानने मान्य केल्याचे त्यांनी म्हटले होते. उलट भारतीय सैन्य चीनच्या हद्दीत घुसल्याचे भूतानला आश्‍चर्य वाटले होते, असेही त्या म्हणाल्या. मात्र, आता भूतानने चीनचा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे. भारतानेही भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवरील निवेदनाचा दाखला दिला आहे. त्याचबरोबर डोकलाम भागातील रस्तेबांधणीचा भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याचेही चीनला कळविले आहे. दरम्यान, डोकलाम येथील वाद सोडवण्यासाठी चीन आणि भूतान यांच्यात चर्चेच्या 24 फेर्‍या झाल्या आहेत तर भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या 19 फेर्‍या आतापर्यंत झाल्या आहेत.
दोन्ही बाजूंकडून मजबुतीकरण
दरम्यान, भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये डोकलाम येथे सुरू असलेला संघर्ष दोन महिन्यांनंतरही निवळण्याची चिन्हे नाहीत. उलट दोन्ही बाजूंनी या भागात लष्करीदृष्ट्या बळकटीकरण सुरूच आहे. या संघर्षामुळे भारतीय प्रशासनाने सीमा भागातील काही गावांमधील नागरिकांचे स्थलांतर केल्याचे वृत्त होते. मात्र, भारतीय लष्कराने हे वृत्त
फेटाळले असून अशा प्रकारचे स्थलांतर करण्याचा अद्याप विचार नसल्याचे म्हटले आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तिबेट येथे अतिरिक्त लष्करी कुमक आणि रणगाडे तैनात करणे सुरूच ठेवले आहे. मात्र, प्रत्यक्ष ताबा रेषेवर कोणतीही मोठी हालचाल चीनने केली नसून भारताच्या सुरक्षा आस्थापनांसाठी धोक्याची घंटा नसल्याचे म्हटले आहे. चीनकडून सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैन्याच्या हालचाली सुरू झाल्यास त्या लगेच समजणे शक्य आहे. समुद्रसपाटीपासून इतक्या उंचीवरील हवामानात काम करण्यास आपले सैन्य सज्ज असून त्यांना तोफखाना, अन्य अवजड शस्त्रास्त्रे आणि रॉकेटस्चे पाठबळ आहे. सध्या सैन्य ‘ना युद्ध, ना शांतता’ अशा स्थितीत सज्ज असून गरज पडल्यास तातडीने प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, असे भारतीय अधिकार्‍यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हा वाद सोडवण्यासाठी राजनैतिक मार्गाने प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चीननेही या भागात काही प्रमाणात लष्करी कुमक वाढवली असली तरी त्यांचे 1500 सैनिक डोकलामपासून काही अंतरावर असल्याचे भारतीय अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, चीनची रस्तेबांधणी भारतीय सैन्याने पूर्णपणे बंद पाडली असून या प्रश्‍नावर नथुला पास येथे दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ सेनाधिकार्‍यांची उद्या (शुक्रवार) बोलणी होण्याची शक्यताही या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: