Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंताचा गोट येथे विजेचा पोल कोसळून दोन वायरमन गंभीर जखमी
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 : पंताचा गोट येथील प्रकाश लॉजनजीक गुरुवारी दुपारी विजेच्या पोलवरकाम करत असताना जीर्ण झालेला पोल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन वायरमन गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुदैवाने ज्यावेळी पोल मुख्य रस्त्यावर पडला त्यावेळी तिथे असणारे नागरिक वाचले. मात्र पार्किंग केलेल्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवराज मोहनराव आदमवाड (वय 27, रा.वंजारवाडी जि. नांदेड) व योगेश लक्ष्मण घोरपडे (वय 24, रा.गोजेगाव) अशी गंभीर जखमी झालेल्या वायरमनची नावे आहेत.
दरम्यान, पोल कोसळल्यानंतर परिसरातील वाहतूक ठप्प झाली. बघ्यांची मोठी गर्दी उसळली. 
पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विजेचा पोल जीर्ण झाल्यानेच तो मोडला आहे. हा पोल बदलावा, अशी मागणी वारंवार करूनही वीज वितरण कार्यालयाने त्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश लॉजनजीक असणार्‍या पोलजवळ शिवराज व योगेश हे दोघे वायरमन कामानिमित्त आले होते. विजेच्या प्रवाहाच्या अनुषंगाने खबरदारी घेतल्यानंतर दोघांनी दुरुस्तीसाठी सुरुवात केली. दोघेही त्यासाठी पोलवर चढले होते. हा परिसर अतिशय वर्दळीचा असून स्टँडकडे जाण्यासाठी रस्ताही आहे. पोलनजीक काही नागरिक बोलत उभे राहिले होेते. ज्या पोलवर वायरमनचे काम सुरू होते, तो विजेचा पोल कमालीचा जीर्ण झाला होता. दुपारी 4 च्या सुमारास दोन्ही वायरमन काम करत असताना पोलचा कट्ट असा आवाज आला. त्यावेळी पोलखाली उभे असणार्‍यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी खबरदारी घेत तेथून बाजूला होत बचाव केला. त्याचवेळी क्षणात तो पोल खाली कोसळला. विजेचा पोल कोसळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. दोन्ही वायरमन पोलखालीच अडकले. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मदतीचा हात दिला. सुमारे 10 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर जखमींना पोलखालून बाहेर काढण्यात आले. जखमींना पोलखालून बाहेर काढल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना सीसीटीव्ही फूटेजमध्येही कैद झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: