Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पनामा पेपर्स : पाकसारखी कारवाई भारतात नाही
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: na1
अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : पनामा पेपर्स प्रकरणात नावे असलेल्या भारतीयांच्या बाबतीत संपूर्ण चौकशीनंतरच कारवाई केली जाईल, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली. पनामा पेपर्स प्रकरणात नाव असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल. मात्र, या प्रकरणात पाकिस्तानात ज्या प्रकारे कारवाई झाली, त्या प्रकारची कारवाई भारतात होणार नाही, असेही जेटली यांनी सांगितले. पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपले पद गमवावे लागले आहे.
या संदर्भात भारतातही तशी कारवाई होणार का, असा प्रश्‍न सरकारला विचारण्यात आला होता. पनामा पेपर्स प्रकरणात नाव आलेल्या व्यक्तींवर नेमकी काय कारवाई झाली, असा सवाल विरोधकांनी विचारला. विरोधकांच्या या प्रश्‍नांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले.  
या प्रकरणात कर विभागाच्या अधिकार्‍यांकडून तपास सुरू आहे. कागदपत्रांच्या आधारे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जेटली यांनी राज्यसभेत सांगितले.
परदेशातील बँक खाती आणि काळा पैसा यांच्या विरोधात मोदी सरकारने सर्वाधिक कारवाई केली आहे. या आधीच्या कोणत्याच सरकारने याविषयी इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली नव्हती,’ असे अरुण जेटली म्हणाले. बँकिंग नियमन (सुधारणा) विधेयकावर चर्चा सुरू असताना जेटली यांनी पनामा पेपर्स प्रकरणावर भाष्य केले. पनामा पेपर्स प्रकरणातील प्रत्येक खात्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सभागृहाला सांगितले.
आपल्या देशात कायदे आहेत. शेजारच्या देशासारखी परिस्थिती आपल्याकडे नाही. आधी पदावरून हटवायचे आणि नंतर चौकशी करून खटला चालवायचा, असा प्रकार भारतात घडणार नाही, अशी माहिती अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली. पनामा पेपर्स प्रकरणात मागील महिन्यात नवाझ शरीफ यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानपदी राहण्यास अपात्र ठरवल्याने शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. आता पनामा पेपर्स प्रकरणात शरीफ आणि त्यांच्या मुलीवर खटला चालवला जाणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: