Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईत विराट दर्शन
ऐक्य समूह
Thursday, August 10, 2017 AT 11:02 AM (IST)
Tags: mn1
भगव्या वादळापुढे राज्य सरकार नतमस्तक
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज मुंबईत काढलेल्या मराठा क्रांती मोर्चात राज्यभरातील लाखो लोक सहभागी झाल्याने संपूर्ण मुंबई भगव्या वादळाने व्यापली होती. मोर्चाचे विराट स्वरूप पाहून देशाची आर्थिक राजधानी काही काळासाठी स्तब्ध झाली होती. अत्यंत शांततामय मार्गाने काढलेला मोर्चा मूक होता, पण त्या शांततेमागे धुमसणार्‍या असंतोषाची दखल सरकारला घ्यावी लागली आणि शिष्टमंडळाशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी काही निर्णयांची घोषणा विधिमंडळात केली.
कोपर्डीच्या घटनेनंतर सुरू झालेले मराठा क्रांती मोर्चाचे वादळ आज मुंबईत पोहोचले. हा मोर्चा अलीकडच्या काळातील सर्व मोर्चांचे विक्रम मोडणार याचा अंदाज होताच. आजवर जिल्हा पातळीवर झालेल्या 57 मोर्चांमध्ये लाखाच्या वर लोक सहभागी झाल्याने हा मोर्चा प्रचंड मोठा असणार याची कल्पना असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मोर्चाच्या प्रमुख मार्गासह त्या मार्गाला जोडणार्‍या सर्व रस्त्यांची वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंबईचा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या विविध कोपर्‍यातून कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली होती. आज सकाळी भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला तरी मोर्चाचे दुसरे टोक भायखळ्यातून पुढे सरकलेले नव्हते. दुसरीकडे हजारो कार्यकर्ते थेट आझाद मैदानावर आले होते. त्यामुळे मोर्चा येण्यापूर्वीच आझाद मैदान तुडुंब भरलेले होते.
‘एक मराठा, लाख मराठा’, असे घोषवाक्य असलेले भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले भगवे टी-शर्ट घातलेले लाखो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने मुंबईतील वातावरण अक्षरश: भगवे झाले होते. कोणतीही घोषण न देता शांततेने निघालेल्या या मोर्चाने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. आजवर राज्यभरात निघालेल्या मोर्चाप्रमाणे मुलींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. हजारो स्वयंसेवक मोर्चा मार्गावरील व्यवस्था सांभाळत होतो. मोर्चाने संपूर्ण रस्ता व्यापला असतानाही जे. जे. रुग्णालयाकडे निघालेल्या एका रुग्णवाहिकेला स्वयंसेवकांनी वाट करून दिली.
कोल्हापूरचे राजे संभाजीराजे छत्रपती, सर्व राजकीय पक्षांचे नेते, खासदार, आमदार या मोर्चात काही काळासाठी सहभागी झाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेही मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा आझाद मैदानावर पोचल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख, नारायण राणे मोर्चेकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन विधान भवनात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांसमवेत शिष्टमंडळाशी चर्चा करून न्यायालयाची आडकाठी नसलेल्या निर्णयांवर तत्काळ निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.   
आशिष शेलार यांना धक्काबुक्की?
मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानावर गेलेल्या मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना संतप्त कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करून हुसकावून लावल्याची घटना घडली; परंतु स्वतः आशिष शेलार यांनी मात्र असे काही घडल्याचा इन्कार केला.
ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती;
आरक्षणाबाबतही सकारात्मक : मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मागासवर्गीय आयोगाने आरक्षणाबाबत कालबद्ध मर्यादेत अहवाल द्यावा, अशी विनंती सरकारकडून करण्यात येईल. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृहे बांधण्याची, ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज विधानसभेत केली. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात भेट घेतली. त्यावेळी सरकार मराठा समाजाबाबत काय पावले उचलत आहे, याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. चर्चेमध्ये काय आश्‍वासने दिली, याची माहिती फडणवीस यांनी नंतर विधानसभेत दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे. न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाला याबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. आयोगाने लवकर अहवाल द्यावा, अशी विनंती सरकारकडून करण्यात येणार आहे. कोपर्डी प्रकरणी विशेष न्यायालय स्थापन करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाच महिन्यांत 31 साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण देखील केल्या आहेत. मात्र, आरोपींच्या वकिलांकडून वेळकाढूपणा करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींच्या वकिलांना न्यायालयाने दंडदेखील ठोठावला आहे. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात असून लवकरच न्यायालयाचा निर्णय येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढविली
छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात आधी 35 अभ्यासक्रम होते, आता 605 अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. 60 टक्के गुणांची अटदेखील शिथिल करून 50 टक्के करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत मराठा समाजाच्या मुलांनाही लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या निर्मितीसाठी राज्य सरकार पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ‘बार्टी’च्या धर्तीवर मराठा समाजाच्या संबंधित संशोधनासाठी पुणे येथे ‘सारथी’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. ही संस्थाही मजबूत करण्यात येणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या संस्थेच्या माध्यमातून तीन लाख मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून 10 लाखांपर्यंतचे कर्जही देण्यात येणार असून व्याजात सवलतही देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातींना आरक्षण आहे. मात्र, अशा 18 जातींना जात प्रमाणपत्रे मिळण्यास अडचण येते. ती दूर करण्यात येणार आहे. रक्ताचे नाते असणार्‍यांना जातपडताळणी प्रमाणपत्र तातडीने मिळावे याबाबतची सुधारणा अंतिम टप्प्यात आहे. तीदेखील लवकरच अंमलात येणार आहे.
मंत्रिमंडळ उपसमिती
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. ही
उपसमिती मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी दर तीन महिन्यांनी चर्चा करेल आणि अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करेल, असे
मुख्यमंत्री म्हणाले. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही निविदा काढण्यात आल्या आहेत. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
चंद्रकांत पाटील उपसमितीचे प्रमुख
मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या उपसमितीचे प्रमुखपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली
कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण, शेतीमालाला योग्य हमीभाव, या मराठा समाजाच्या मागण्या असताना सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. जुनीच आश्‍वासने नव्याने देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित
पवार यांनी केली.
मराठा समाजाचे कार्यकर्ते जोपर्यंत मुंबईमध्ये थांबून होते, तोपर्यंत सरकार प्रचंड हादरले होते; परंतु जसजसे मोर्चेकरी माघारी परतू लागले तेव्हा सरकारने या मोर्चाकडे दुर्लक्ष केले. आज विधिमंडळात शिष्टमंडळासोबत आलेल्या मोर्चातील लहान मुली आपल्या मागण्या पोटतिडकीने मुख्यमंत्र्यापुढे मांडत होत्या; परंतु मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या 57 मोर्चांवेळी जी आश्‍वासने दिली, तीच आश्‍वासने त्यांना यावेळीही दिली. काही मागण्या पूर्ण करत असताना शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसारखे असे काही नियम व अटी घालायच्या, की त्याचा लाभ गरजू विद्यार्थांना मिळूच नये. शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणत आहेत, की स्मारकाच्या उभारणीसाठी टेंडर निघाले आहे. लवकरच काम सुरू करू. मग, आतापर्यंत टेंडर निघाले नसताना स्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट कशासाठी घातला होता, असा सवाल अजित पवार यांनी सरकारला केला.
मुख्यमंत्री आज म्हणत आहेत, की प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारू. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यासासाठी त्यांनी मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचे आश्‍वासन दिले. मग, आतापर्यंत सरकार झोपले होते का? मराठा समाजाला शांत करण्यासाठी केवळ घोषणा करायच्या. प्रत्यक्षात मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करायची नाही असे या सरकारचे धोरण असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: