Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

दुसर्‍या कसोटीत भारताचा डावाने विजय
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: sp1
5कोलंबो, दि. 6 (वृत्तसंस्था) : शतकवीर दिमुथ करुणरत्ने आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांच्या झुंजार फलंदाजीनंतरही रवींद्र जडेजाच्या पाच बळींच्या जोरावर भारतीय संघाने कोलंबो कसोटी चौथ्या दिवशी श्रीलंकेवर एक डाव आणि 53 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे कोहली आणि कंपनीने तीन कसोटींची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. भारताने लंकेच्या भूमीत एका डावाने प्रथमच विजय मिळवला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने दोन वर्षांपूर्वी लंकेतच मालिका जिंकून यशोगाथेची सुरुवात केली होती. त्याच श्रीलंकेत एक कसोटी बाकी असतानाच भारताने मालिका जिंकून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. शतकवीर कुशल मेंडिस व दिमुथ करुणरत्ने यांनी तिसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजांना घाम गाळायला लावला होता. मात्र, चौथ्या दिवशी जडेजा भारताच्या विजयाचा हिरो ठरला.
भारताने पहिल्या डावात 9 बाद 622 अशी बलाढ्य धावसंख्या उभारल्यावर डाव घोषित केला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी लंकेचा पहिला डाव 183 धावांत गुंडाळल्यामुळे कोहलीने लंकेला फॉलोऑन दिला होता. मात्र, दुसर्‍या डावात लंकेचे सलामीवीर मेंडिस व करुणरत्ने यांनी झुंजार फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना शनिवारी तंगवले होते. तिसर्‍या दिवशी अखेरच्या सत्रात शतकवीर मेंडिसला माघारी धाडण्यात अखेर भारतीय संघाला यश आले होते. मात्र, करुणरत्नेने नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमाराच्या साथीत आणखी पडझड होऊ दिली नव्हती. चौथ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांना पहिले यश मिळवण्यासाठी तब्बल पाऊण तास प्रतीक्षा करावी लागली. सकाळच्या सत्रात करुणरत्ने आणि पुष्पकुमारा यांनी तिसर्‍या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. या दरम्यान करुणरत्ने 95 धावांवर असताना शॉर्ट लेगला लोकेश राहुलने त्याला जीवदान दिले. या जीवदानानंतर करुणरत्नेने आपले सहावे शतक साजरे केले. ही जोडी डोईजड होत असतानाच अश्‍विनला विचित्र फटका मारण्याच्या नादात पुष्पकुमाराचा त्रिफळा उडाला. त्या पाठोपाठ जडेजाने कर्णधार दिनेश चंदीमलला बाद करून यजमानांना चौथा धक्का दिला. स्लीपमध्ये अजिंक्य रहाणेने चंदीमलचा सुंदर झेल घेतला.
त्यानंतरही करुणरत्नेने एका बाजूने किल्ला लढवला. त्याला माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची भक्कम साथ लाभली. या दोघांनी बराच वेळ भारतीय गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. अश्‍विनचे चेंडू फारसे धोकादायकरित्या वळत नव्हते. मात्र, जडेजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत दोन्ही फलंदाजांना चांगलेच सतावले. त्यानंतरही भारताला यश मिळू शकले नाही. अखेर लंकेच्या डावातील 80 षटके झाल्यानंतर कोहलीने नवा चेंडू घेतला. त्याने वेगवान गोलंदाजांना
पाचारण केले. त्यांचाही करुणरत्ने व मॅथ्यूज यांनी चांगला सामना केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारीही नोंदवली. त्यामुळे लंकेने 4 बाद 310 अशी धावसंख्या गाठत डावाचा पराभव टाळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती.
अखेर जडेजाने भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. त्याच्या गोलंदाजीवर रहाणेने स्लीपमध्ये करुणरत्नेचा झेल टिपला. जडेजाचा अचानक उसळलेला चेंडू करुणरत्नेच्या ग्लोव्हला चाटून रहाणेच्या हातात विसावला. करुणरत्नेने तब्बल 307 चेंडूंचा सामना करत 16 चौकारांच्या साह्याने 141 धावांची खेळी केली. करुणरत्ने बाद झाल्यानंतर लंकेची घसरगुंडी उडाली. जडेजानेच मॅथ्यूजचा अडसर दूर केला. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने सोपा झेल पकडला. त्यानंतर दिलरुवान परेराने फटकेबाजीचा प्रयत्न केला. त्याने 17 चेंडूत 4 चौकारांसह 17 धावा केल्यानंतर जडेजाच्या गोलंदाजीवर विकेट फेकली. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा परेराचा प्रयत्न अंगलट आला. त्याला साहाने यष्टीचित केले. त्यानंतर नीरोशान डिकवेला (31) आणि धनंजय डिसिल्वा यांनी थोडा फार प्रतिकार केला. जडेजाने डिसिल्वाला माघारी धाडत लंकेला आठवा धक्का दिला. पुन्हा एकदा रहाणेने स्लीपमध्ये छान झेल घेतला.
डिकवेलाची फटकेबाजी हार्दिक पांड्याने संपुष्टात आणली. डिकवेलानेही स्लीपमध्ये रहाणेकडे झेल दिला. त्यानंतर अश्‍विनने नुवान प्रदीपचा बळी मिळवला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. 4 बाद 310 अशा सुस्थितीनंतर यजमानांनी उर्वरित सहा फलंदाज अवघ्या 76 धावांमध्ये गमावले. जडेजाने डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम नवव्यांदा केला. हार्दिक पांड्या आणि अश्‍विनने प्रत्येकी दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली. उमेश यादवने एक बळी घेतला.
चौथ्या दिवशीही अनेक विक्रम
कोलंबो कसोटीच्या चौथ्या दिवशीही अनेक विक्रम नोंदवले गेले.  यापूर्वी भारताला लंकेत कधीही डावाने विजय मिळवता आला नव्हता. तो पराक्रम भारताने या कसोटीत केला. त्याशिवाय कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग आठ कसोटी मालिका  जिंकण्याचा विक्रम नोंदवला. अशी किमया भारताच्या आतापर्यंतच्या कोणत्याही कर्णधाराला
जमलेली नाही. कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉला मागे टाकले. वॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सलग सात कसोटी मालिका जिंकल्या होत्या. मात्र, कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग
याच्या मागे आहे. पाँटिंगने 2005-08 या कालावधीत आपल्या संघाला सलग नऊ मालिका विजय मिळवून दिले होते. इंग्लंडच्या संघानेही 1884 ते 1892 या कालावधीत नऊ कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
श्रीलंकेत दोन मालिका विजय मिळवणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा अपवाद वगळता भारताने 7 देशांमध्ये कसोटीत डावाने विजय मिळवला आहे. भारताच्या दोन खेळाडूंनी एकाच सामन्यात 5 बळी आणि अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम प्रथमच केला आहे. जडेजा व अश्‍विन या दोघांनीही अर्धशतके ठोकली. त्यानंतर अश्‍विनने लंकेच्या पहिल्या डावात तर जडेजाने दुसर्‍या डावात पाच बळी घेतले. अजिंक्य रहाणेने 39 कसोटी सामन्यांमध्ये झेलांचे अर्धशतक पूर्ण केले.
श्रीलंकेकडूनही दोन विक्रम नोंदवले गेले. फॉलोऑननंतर दोन शतके करणारा दिमुथ करुणरत्ने हा पहिलाच श्रीलंकन फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर फॉलोऑन मिळाल्यानंतर एकाच डावात श्रीलंकेच्या दोन खेळाडूंनी शतके ठोकण्याचा विक्रमही कोलंबो कसोटीत प्रस्थापित झाला.
धावफलक : भारत (पहिला डाव) : 9 बाद 622 (डाव घोषित).
श्रीलंका (पहिला डाव) : सर्वबाद 183.
श्रीलंका (दुसरा डाव) : दिमुथ करुणरत्ने झे. रहाणे गो. जडेजा 141, उपुल थरंगा त्रि. गो. यादव 2, कुशल मेेंडिस झे. साहा गो. पांड्या 110, मलिंदा पुष्पकुमारा त्रि. गो. अश्‍विन 16, दिनेश चंदीमल झे. रहाणे गो. जडेजा 2, अँजेलो मॅथ्यूज झे. साहा गो. जडेजा 36, नीरोशान डिकवेला झे. रहाणे गो. पांड्या 31, दिलरुवान परेरा यष्टीचित साहा गो. जडेजा 4, धनंजय डिसिल्वा झे. रहाणे गो. जडेजा 17, रंगना हेराथ नाबाद 17, नुवान प्रदीप झे. धवन गो. अश्‍विन 1, अवांतर 9, एकूण 116.5 षटकांत सर्वबाद 386.
गोलंदाजी : उमेश यादव 13-2-39-1, रविचंद्रन अश्‍विन 37.5-7-132-2, मोहम्मद शमी 12-3-27-0, रवींद्र जडेजा 39-5-152-5, हार्दिक पांड्या 15-2-31-2.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: