Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फुटीरतावादी शब्बीर शाहच्या साथीदाराला अटक
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: na1
‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणी ‘ईडी’ची कारवाई
5श्रीनगर, दि. 6 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता शब्बीर शाह याचा साथीदार मोहम्मद अस्लम वणी (वय 36) याला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी रविवारी श्रीनगर येथून अटक केली. दहा वर्षांपूर्वीच्या पैशांच्या अफरातफर प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने  ही कारवाई करण्यात आली असून वणी हा हवाला एजंट म्हणून काम करत होता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
मोहम्मद वणी याला दिल्लीला नेण्यात येणार असून पुढील कोठडीसाठी त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी दिल्लीतील न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट मिळवले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वणी याला अनेकदा समन्स बजावूनही तो चौकशीला उपस्थित राहिला नव्हता, असे या अधिकार्‍याने सांगितले.
‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणी शब्बीर शाह हा सध्या ‘ईडी’च्या कोठडीत आहे. त्याला आणि वणीला एकमेकांसमोर आणून दोघांची चौकशी केली जाणार आहे. या दोघांविरुद्ध ‘ईडी’ने ऑगस्ट 2005 मध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वणीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने यापूर्वी अटक केली होती. आपण शब्बीर शाहला सव्वादोन कोटी रुपये दिल्याचा दावा वणीने केला होता. दिल्ली न्यायालयाने वणीला दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. मात्र, शस्त्रास्त्र कायद्यान्वये त्याला दोषी ठरवले होते.
वणी याने हवालामार्फत मध्य-पूर्वेतून 63 लाख रुपयांची रोकड आणि शस्त्रास्त्रे आणली होती. या मुद्देमालासह त्याला 26 ऑगस्ट 2005 रोजी पकडण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने 50 लाख रुपये शाहला आणि 10 लाख रुपये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या श्रीनगर भागातील कमांडर अबू बकरला दिल्याचे सांगितले होते. उर्वरित रक्कम आपल्या कमिशनची होती, असेही त्याने सांगितले होते. गेल्या काही वर्षांत आपण शाह आणि त्याच्या नातेवाइकांना वेळावेळी 2.25 कोटी रुपये दिल्याची कबुली त्याने ‘ईडी’ला दिली होती. ही रक्कम दहशतवाद्यांना पुरवण्यात आलेल्या आर्थिक मदतीमधील होती, अशी माहिती ‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: