Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींना पोलिसांचे संरक्षण : संदीप पाटील
ऐक्य समूह
Saturday, August 05, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 4 :सातारा जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींना पोलिसांचे सरंक्षण असणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला.
जिल्ह्यातील सर्व उद्योजक व पोलीस अधिकार्‍यांची शिवतेज हॉलमध्ये शुक्रवारी दुपारी  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजकांच्या अडचणी व पोलिसांशी त्यांचा संवाद यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.
संदीप पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींना संरक्षण पुरवण्याची आमची जबाबदारी आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा विषय येत असेल तेथे लगेच पोलिसांना सांगावे. कंपनी बंद पडू न देणे यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत.
उद्योजकांनी कुठल्याही दबावाला घाबरू नये. सोना अलॉईज कंपनीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून मोफत बंदोबस्त पुरवण्यात आला असून कमिन्स येथील वादावेळी पोलिसांनी योग्य भूमिका बजावली आहे. यापुढेही पोलीस असेच काम करत राहतील.   
आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर एखादी कंपनी बंद पडणार नाही यासाठी पोलीस सदैव कर्तव्य बजावतील. दरम्यान, बहुतेक एमआयडीसीच्यावतीने पोलिसांसाठी गस्तीसाठी वाहने, पोलिसांना थांबण्यासाठी उपलब्ध केल्याने त्याबाबतचे कौतुक करण्यात आले. लोणंदमधील सोना अलॉईज व फलटण येथील कमिन्स प्रकरणात पोलिसांनी योग्य मदत केल्याने उद्योजकांकडून पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले. एमआयडीसीतील प्रत्येक कंपनीने जे सीसीटीव्ही लावले आहेत त्यामध्ये रस्त्याचेही फुटेज मिळेल अशा पद्धतीने कॅमेरे लावावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. प्रारंभी जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या अडचणी मांडल्या. यामध्ये सातार्‍यातील संगमनगर येथे भाजी मंडई भरत असून ती उठवावी, पोलिस गस्त वाढवावी, लेबर वादविवाद, रस्ते, वीजसेवा अशा अडचणी मांडल्या. या सर्व प्रश्‍नांना पोलिसांकडून उत्तरे देण्यात आली. यावेळी सातारा, लोणंद, शिरवळ, कराड, फलटण येथील उद्योजक, त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: