Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान
ऐक्य समूह
Saturday, August 05, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: na1
व्यंकय्या नायडूंचा विजय निश्‍चित
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उद्या (शनिवार) संसदेत मतदान होणार असून सायंकाळी 7 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी लोकशाही आघाडीचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत आहे. मात्र, संसदेत रालोआकडे मोठे बहुमत असल्याने या निवडणुकीत नायडूंचा विजय निश्‍चित मानला जात आहे.
उपराष्ट्रपतिपदासाठी उद्या संसदेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. राष्ट्रपतिपदापेक्षा उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक वेगळी असते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांबरोबर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील आमदारांना मतदान करता येते. मात्र, उपराष्ट्रपतिपदासाठी केवळ लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना मतदानाचा अधिकार आहे.
भाजपप्रणित रालोआकडे लोकसभेत प्रचंड बहुमत आहे. राज्यसभेत रालोआ अल्पमतात असली तरी तेथेही त्यांचे संख्याबळ लक्षणीय आहे. त्यामुळे या निवडणुकीत एम. व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. विरोधकांनी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रालोआच्या बाजूने मतदान करणार्‍या बिजू जनता दल व संयुक्त जनता दल यांनी या निवडणुकीत गांधी यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त जनता दलाने बिहारमधील महाआघाडीशी फारकत घेऊन भाजपसमवेत सरकार स्थापन केले असले तरी विरोधकांच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय या पक्षाने कायम ठेवला आहे. या निवडणुकीसाठी खास पेनने मतदान करावे लागणार आहे. अन्य कोणत्याही पेनने मतदान केल्यास ते बाद ठरवले जाईल. या निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाला ‘व्हिप’ जारी करता येणार नाही.  
मतपत्रिकेत दोन्ही उमेदवारांची नावे असणार असून राजकीय पक्षांचे चिन्ह राहणार नाही. मतदान गुप्त पद्धतीने होणार आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे एकूण संख्याबळ 790 आहे. मात्र, लोकसभेत दोन तर राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. भाजपचे लोकसभेतील खासदार छेदी पासवान हे न्यायालयाच्या एका निर्णयामुळे मतदानासाठी अपात्र ठरले आहेत. 545 सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत भाजपचे 281 खासदार असून रालोआतील घटक पक्षांचे मिळून एकूण 338 खासदार आहेत. 243 सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत भाजपचे 56 तर सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे 58 सदस्य आहेत. दिवंगत माजी मंत्री अनिल माधव दवे यांच्या रिक्त जागी मध्य प्रदेशातून संपातिया उईके हे बिनविरोध निवडून गेले असले तरी त्यांना मतदान करता येणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या महिन्यात राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या खासदारांना मात्र या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. अन्सारी यांनी सलग दोन टर्म उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिले आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: