Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खा. उदयनराजे यांना कायम जामीन मंजूर, हजेरीची अट रद्द
ऐक्य समूह
Thursday, August 03, 2017 AT 11:09 AM (IST)
Tags: lo2
लोणंद एम.आय.डी.सी.मध्ये न्यायालयाच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही
5सातारा, दि. 2 : लोणंद येथील उद्योजकाला खंडणी मागितल्या प्रकरणात खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांना बुधवारी जिल्हा अतिरिक्त सत्रन्यायाधीश वाय.एच.आमेटा यांनी कायम जामीन मंजूर केला  आहे. हा जामीन मंजूर करताना त्यांची पोलीस ठाण्यातील एक दिवसाआड हजेरीही रद्द करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय  त्यांना लोणंद एम.आय.डी.सी.मध्ये जावू नये, अशी अट घालण्यात आली आहे.
दरम्यान, खा. उदयनराजे यांच्या जामीन अर्जावर निर्णय होणार असल्याने पोलिसांनी सकाळी 11 वाजल्यापासूनच राजवाडा, मोती चौक, पोवई नाका व जिल्हा न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर सुमारे दीडशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, लोणंद येथील सोना अलॉइज कंपनीच्या मालकाला  खंडणी मागून जीवंत मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी खा.उदयनराजेंसह 12 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. 26 मार्चरोजी गुन्हा दाखल झाला होता.  गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटकही केली होती. मात्र, खा.उदयनराजे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज करून जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या दोन्ही ठिकाणी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. गुन्हा दाखल असल्याने खा.उदयनराजे 3 महिने सातार्‍यातही आले नव्हते.
दि. 22 जुलै रोजी रात्री खा.उदयनराजे यांनी सातार्‍यात रोड शो केला होता. या घटनेनंतर दि. 25 जुलै रोजी खा.उदयनराजे स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर सातारा बंद झाला. अटकेच्या निषेधार्थ तोडफोड व जाळपोळीच्या हिंसक घटना घडल्या. खा.उदयनराजे यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना अंतरिम अटकपूर्व  जामीन मंजूर करण्यात आला. बचाव पक्षाने लगेचच अंतरिम जामिनासाठी अर्ज केल्यानंतर अवघ्या काही तासात तो अर्ज मंजूर झाल्याने त्यांची सुटका झाली. अंतरिम जामीन मंजूर करताना खा.उदयनराजे यांना एकआड दिवस पोलीस ठाण्यामध्ये हजेरी ठेवण्यात आली होती तर कायम जामिनाबाबत दि. 2 ऑगस्ट रोजीची तारीख ठेवण्यात आली.
 दुपारी तीन वाजता सरकार व बचाव पक्षाने युक्तिवाद केला. बचाव पक्षाने कायम जामीन मंजूर करून खा.उदयनराजे यांची पोलीस ठाण्यातील हजेरी रद्द करावी, असा युक्तिवाद केला. यावेळी बचाव पक्षाच्यावतीने पोलिसांनीही तपास पूर्ण झाला असल्याचे न्यायाधीशांना सांगितले. न्यायाधीशांनी पोलिसांना लेखी म्हणणे मागितल्यानंतर पोलिसांनी ते सादर केले. त्यानुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ऑर्डर झाली. खा.उदयनराजे यांच्यावतीने अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. ताहेर मणेर यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: