Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

जीवघेणा व्हिडिओ खेळ
vasudeo kulkarni
Thursday, August 03, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: lolak1
गेल्या काही वर्षात दूरसंचार क्षेत्रात  प्रचंड क्रांती झाली. सारे जग जवळ आले. साता समुद्रापार असलेल्या आपल्या मित्र, परिवाराशी क्षणार्धात संपर्क साधणे, संवाद साधणे शक्य झाले. साध्या मोबाईलचा औत्सुक्याचा जमानाही गेला आणि आता स्मार्टफोनचे नवे संपर्क साधन सहज उपलब्ध झाले. स्मार्टफोनद्वारे जगातल्या माहितीचा, मनोरंजनाचा खजिनाच सामान्यांनाही उपलब्ध झाला. शालेय, महाविद्यालयीन मुलामुलींच्या हातातही स्मार्टफोन दिसायला लागले. पण, याच नव्या तंत्राच्या इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनच्या अतिवापर आणि या साधनाचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे समाजात नव्या विकृत्यांचाही प्रवेश झाला. स्मार्ट फोनवर सेल्फी काढण्याच्या नादात देशात गेल्या दोन वर्षात 200 च्या वर युवक-युवतींचे बळी गेले आहेत. स्मार्टफोनवरच्या इंटरनेटचा किती आणि केव्हा वापर करायचा याला काही मर्यादा हव्यात, याचे भान तरुणाईला राहिलेले नाही. काही श्रीमंत पालक आपल्या मुला-मुलींच्या हातात स्मार्टफोन देताना, त्याचा गैरवापर तर होणार नाही याचा साधा विचारही करीत नाहीत. आपला मुलगा-मुलगी अधिक वेळ मोबाईलवरचे व्हिडिओ गेम खेळतो काय? फेसबुक, ट्विटरद्वारे तथाकथित सोशल मीडियाचा वापर तो कशासाठी करतो याबाबत  पालकांनी अधिक सतर्क आणि सावध राहायला हवे. अन्यथा स्मार्टफोनचे हे खूळ आपल्या मुलाला प्राणघातक ठरेल, याचे भान पालकांनी ठेवायला हवे, अशी भयंकर घटना अलीकडेच मुंबईत घडली आहे.
स्मार्टफोनवर काही महिन्यांपूर्वी ‘पोकेमॅन’ च्या खेळाचे खूळ माजले होते. मुली-मुले या खेळात दंग होऊन सैरावैरा धावत होती. आता ‘ब्ल्यू व्हेल गेम’ हा आत्महत्येला प्रवृत्त करणारा नवा अतिभयंकर आणि प्राणघातक खेळ लॅपटॉप, स्मार्टफोनवर उपलब्ध झाला आणि त्याचे विघातक परिणामही सरकार, पालक आणि जनतेसमोर यायला लागले आहेत.
मुंबईतल्या अंधेरी परिसरात राहणार्‍या मनप्रीत या इयत्ता नववीत शिकणार्‍या कोवळ्या मुलाने, या भयंकर खेळाच्या आहारी जाऊन 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना  घडली आहे. उडी मारण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांनाही, आपण क्षणार्धात आत्महत्या करणार आहोत, असे सोशल साईटवरून कळवलेही होते. दोन दिवसांपूर्वी त्याने आपल्या मित्रांना इंटरनेटवरून, आपण आत्महत्येच्या  दिशेने जात आहोत, असे कळवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळे मुंबईत एका मुलाच्या झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेत, या खेळावर बंदी घालायसाठी केंद्र सरकारशी तातडीने संपर्क साधायची ग्वाही विधिमंडळात दिली आहे.
2013 मध्ये रशियातल्या फिलिप बुडेकिन या पंचवीस वर्षाच्या युवकाने या महाभयंकर मृत्यूला कवटाळायला लावणार्‍या ऑनलाइन व्हिडिओ खेळाची निर्मिती केली. इंटरनेटवर त्याने हा खेळ   अपलोड केल्यावर, या खेळाच्या चक्रव्यूहात अडकून आतापर्यंत रशियातल्या 130  आणि जगातल्या 140 युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. हा खेळ इंटरनेटवरून डाऊनलोेड केल्यावर तो काढून टाकता येत नाही. 50 दिवसांच्या या ऑनलाइन खेळात विविध टप्प्यात खेळात अडकलेल्या युवकाला, सूत्रधाराच्या आज्ञेनुसार साहसी कृत्ये करावी लागतात. त्यात हातावर  ब्लेड मारून घेणे, पहाटे एकट्यानेच निर्जन ठिकाणी जाणे, रात्री भयावह चित्रपट पाहणे, उंच इमारतीच्या छतावर जाऊन संगीत ऐकणे, स्वत:वर चाकूचे वार करून घेणे अशा आव्हानांची पूर्तता करावी लागते. ही आव्हाने पूर्ण केल्यावर खेळात सहभागी झालेल्यांना शेवटच्या दिवशीचे आव्हान, म्हणजे ‘आत्महत्या’ करायची आज्ञा दिली जाते आणि या खेळाच्या सापळ्यात अडकलेले, मानसिक सारासार विचार गमावलेेले युवक आत्महत्याही करतात. या खेळाची निर्मिती करणार्‍या त्या विकृत क्लिपला रशियन सरकारने तुरुंगातही डांबले होते. तो मानसिक विकृतीने पछाडलेला असल्याचे त्या सरकारचे
म्हणणे आहे. आता केवळ केंद्र सरकारच नव्हे तर जगातल्या सर्वच राष्ट्रांनी या असल्या जीवघेण्या ऑनलाइन खेळावर पूर्णपणे  बंदीच आणायला हवी.     
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: