Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

लंकेविरुद्ध विजयी आघाडी घेण्याचा निर्धार
ऐक्य समूह
Thursday, August 03, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: sp1
दुसर्‍या कसोटीत कोहलीपुढे सलामीच्या जोडीचा पेच
5कोलंबो, दि. 2 (वृत्तसंस्था) : श्रीलंकेविरुद्ध उद्यापासून सुरू होणारी दुसरी कसोटी जिंकून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा निर्धार असतानाच कर्णधार विराट कोहलीपुढे सलामीच्या जोडीचा पेच निर्माण झाला आहे. तापाने आजारी असलेला लोकेश राहुल तंदुरुस्त झाल्याने पहिल्या कसोटीतील सलामीवीर शिखर धवन व अभिनव मुकुंद यांच्यापैकी कोणाला वगळायचे, असा प्रश्‍न कोहलीपुढे आहे. अर्थात, मालिका जिंकण्याच्या टीम इंडियाच्या मार्गात या समस्येचा अडसर ठरणार नाही, हे निश्‍चित.
गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा नियमित सलामीवीर लोकेश राहुल हा खेळू शकला नव्हता. तो विषाणूजन्य तापाने आजारी असल्याने पर्यायी सलामीवीर शिखर धवनला सलामीच्या जोडीत संधी देण्यात आली होती. राहुलच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाच्या कामगिरीवर काहीही परिणाम झाला नव्हता. ही कसोटी भारताने तब्बल 304 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, आता राहुल आजारातून बरा झाला असून सामन्यासाठी आवश्यक असलेली तंदुरुस्ती त्याने सिद्ध केली तर सलामीसाठी दुसरा फलंदाज निवडताना धवन व मुकुंद यांच्यात नाणेफेक करावी लागेल.
राहुलच्या अनुपस्थितीमुळे मिळालेल्या संधीचे सोने करत धवनने गॉल येथे कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकवताना 168 चेंडूत 190 धावा कुटल्या होत्या. अभिनव मुकुंद पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अपयशी ठरला होता तरी ती कसर त्याने दुसर्‍या डावात भरून काढली होती. त्याने दुसर्‍या डावात 81 धावा केल्या होत्या. त्यामुळे राहुलला त्याचे स्थान पुन्हा देण्यासाठी धवन आणि मुकुंद यांच्यापैकी कोणाला वगळायचे, असा पेच कोहलीसमोर आहे. अर्थात धवनची पहिल्या डावातील खेळी पाहता मुकुंदला राहुलसाठी जागा मोकळी करावी लागेल, अशी स्थिती आहे. संघातील प्रत्येक स्थानासाठी असलेली स्पर्धा, हे टीम इंडियासाठी सुचिन्हच आहे. सलामीच्या जोडीचा पेच असला तरी त्याचा परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवर होणार नाही, हे निश्‍चित आहे.
त्याउलट यजमान संघासमोर पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसर्‍या कसोटीत अनेक समस्या आहेत. मोजके अपवाद वगळता त्यांचे गोलंदाज आणि फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकले नव्हते. त्यामुळे दुसर्‍या कसोटीत त्यांच्यासमोरील आव्हान कडवे आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत दोन संघांच्या मानांकनातही मोठा फरक आहे. या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल आहे तर यजमान संघ सातव्या स्थानावर आहे. गॉल कसोटीनंतर दोन्ही संघांमधील अंतर आणखी वाढले आहे. बरोबर एक वर्षापूर्वी यजमानांची स्थिती आतासारखी बिकट नव्हती. त्यावेळी लंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-0 असे निर्भेळ यश मिळवले होते. मात्र, एका वर्षातच परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. त्यावेळच्या आणि आताच्या खेळपट्ट्यांमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे लंकेची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर संघातील खेळाडूंचा फॉर्म हरवला असतानाच या संघाला दुखापतींनीही ग्रासले आहे. त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार दिनेश चंदिमाल तंदुरुस्त झाला आहे. चंदिमालने 2015 मध्ये गॉल कसोटीत भारताविरुद्ध 169 चेंडूत 162 धावा ठोकताना कसोटीला निर्णायक कलाटणी दिली होती. त्याच्याकडून आता पुन्हा तशाच कामगिरीची अपेक्षा लंकेला आहे. जायबंदी फलंदाज असेला गुणरत्नेच्या जागी अनुभवी फलंदाज लाहिरू थिरीमन्नेला परत बोलावण्यात आले आहे. पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना गुणरत्नेच्या डाव्या अंगठ्याचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. थिरीमन्नेने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याने
पुनरागमन करताना गॉल कसोटीच्या आधी झालेल्या सराव सामन्यात भारताविरुद्ध 59 धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटीत लंकेचे नेतृत्व करणारा डावखुरा फिरकीपटू रंगना
हेराथ यालाही दुखापत झाल्याने तो दुसर्‍या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले असता फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याचा हात अजून सुजलेला आहे.
हेराथच्या तंदुरुस्तीच्या चाचणीवर त्याचा दुसर्‍या कसोटीतील सहभाग अवलंबून आहे. त्यामुळे लंकेने डावखुरा मनगटी फिरकीपटू लक्षन संदकन याला पाचारण केले आहे. हेराथ खेळू शकला नाही तर डावखुरा फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमाराला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. पुष्पकुमाराला हेराथचा समर्थ पर्याय म्हणून ओळखले जाते. कोलंबो मैदानावर भारताविरुद्ध यजमानांची कामगिरी संमिश्र आहे. या मैदानावर या दोन संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या आठ कसोटी सामन्यांपैकी चार अनिर्णित राहिले आहेत तर यजमानांनी आणि भारताने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. गेल्या वेळी 2015 मध्ये या मैदानावर झालेल्या कसोटीत भारताने 117 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
त्या मालिकेत खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत राखण्यात आले होते. त्यावेळी मुरली विजय व शिखर धवन हे दोन्ही नियमित सलामीवीर जायबंदी झाल्याने चेतेश्‍वर पुजारा आणि लोकेश राहुल यांना डावाची सुरुवात करावी लागली होती. पुजाराने पहिल्या डावात नाबाद 145 धावांची जबरदस्त खेळी करताना भारताच्या विजयाची पायाभरणी केली होती. आता दोन वर्षांनी पुजारा त्याच्या आवडत्या तिसर्‍या क्रमांकावर पुन्हा श्रीलंकेत खेळणार आहे. त्याचबरोबर त्याचा हा 50 वा कसोटी सामना असेल. विशेष म्हणजे गॉल येथे रविचंद्रन अश्‍विनने आपल्या कारकिर्दीतील
50 वी कसोटी खेळली होती.
भारताने तब्बल 23 वर्षांच्या खंडानंतर 2015 मध्ये कोलंबो कसोटीत विजय मिळवून नंतर मालिकाही 2-1 ने जिंकली होती. त्या आधी 1993 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोलंबोतील कसोटी 235 धावांनी जिंकून मालिकादेखील 1-0 ने खिशात घातली होती. त्यानंतर कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघालाच लंकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवता आला होता. भारताचे मुख्य प्रशिक्षक
रवी शास्त्री यांनी मंगळवारी हीच बाब अधोरेखित केली होती.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2015 मध्ये तुलनेने दुबळ्या झालेल्या लंकेवर मालिका विजय मिळवला होता. आता प्रशिक्षक शास्त्री यांचे म्हणणे खरे करण्यासाठी कोहलीच्या संघासमोर त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, ईशांत शर्मा, भुवनेश्‍वकुमार.
श्रीलंका : दिनेश चंदिमाल (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, दिमुथ करुणरत्ने, नीरोशान डिकवेला, कुशल मेेंडिस, धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतिलक, लाहिरू कुमारा, विश्‍व फर्नांडो, नुवान प्रदीप, रंगना हेराथ, दिलरुवान परेरा, मलिंदा पुष्पकुमारा, लक्षन संदकन, लाहिरू थिरीमन्ने.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: