Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

वैद्यकीय शिक्षण महागले
vasudeo kulkarni
Monday, July 31, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: lolak1
 वैद्यकीय आणि उच्च तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात विनाअनुदानित संस्थांनी शिक्षणाचा अक्षरश: बाजार मांडल्याने, सर्वसामान्यांना अशा संस्थातून शिक्षण घेणे अति महागडे आणि अवाक्याबाहेरचे झाले आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्तेनुसार एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, त्या महाविद्यालयांचे पूर्वीचेच लाखो रुपयांचे वार्षिक शुल्क परवडत नव्हते. बँकातून शैक्षणिक कर्जे काढून आपल्या मुलांना डॉक्टर करणार्‍या पालकांना, या पुढच्या काळात मात्र, असे स्वप्नही पाहणे शक्य नाही, अशी स्थिती महाराष्ट्रातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रचंड शुल्कवाढ केल्याने निर्माण झाली आहे. एम. बी. बी. एस. आणि बी. डी. एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या वार्षिक शुल्कात सरासरी 25 ते 30 टक्के वाढ करायला शैक्षणिक शुल्क समितीने मान्यता दिली. परिणामी साडे चार वर्षाच्या या अभ्यासक्रमाचे शुल्क 21 ते 42 लाख रुपयांपर्यंत नव्या शुल्क वाढीने अधिक मिळणार असले तरीही राज्यातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना मात्र यापेक्षा अधिक शुल्कवाढ हवी आहे. वैद्यकीय महाविद्या-लयांच्या शुल्कात झालेली वाढ समाधानकारक नाही. ते वाढवून मिळावे, अशी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी केलेल्या मागणीचे प्रस्ताव मान्य झाल्यास अशा काही महाविद्यालयांचे साडे चार वर्षाचे वार्षिक शुल्क 50 लाख रुपयांच्या आसपास जाईल. राज्यातल्या बहुतांश खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी वार्षिक शुल्क साडे पाच ते साडे दहा लाख रुपये असावे, अशी मागणी शैक्षणिक शुल्क समितीकडे केली आहे. तर व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना सरासरी 30 लाख रुपयांचे म्हणजेच साडे चार वर्षासाठी सरासरी सव्वा ते दीड कोटी रुपये शुल्क भरावे लागेल. शैक्षणिक कर्ज काढून गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एम. बी. बी. एस. ची पदवी मिळवल्यावर, हे कर्ज फेडायसाठी वार्षिक 15 लाख रुपयांची कर्जफेड व्याजासह करावी लागेल. हे एवढे पैसे हे नवे डॉक्टर कसे आणि कोठून फेडणार? याचा विचार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला करावा वाटत नाही. गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात फक्त एम. बी. बी. एस. पदवी मिळवलेल्या डॉक्टर्सचा व्यवसाय चालत नाही, अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी एम. बी. बी.  एस. नंतर एम. एस. किंवा एम. डी. ही पदव्युत्तर पदवी मिळवल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुळातच एम. बी. बी. एस. साठी एवढे प्रचंड शुल्क आणि साडे चार वर्षाचा अन्य खर्च केल्यावर, पदव्युत्तर पदवीसाठी सामान्य विद्यार्थ्यांचे पालक पुन्हा लक्षावधी रुपये कसे जमा करणार? एवढे प्रचंड शुल्क भरून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना पदवी मिळवल्यावर, सामान्य रुग्णांच्याकडूनच हे पैसे वसूल करण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी मुळातच महागडे झालेले वैद्यकीय उपचार अधिकच महागडे होतील. राज्यातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. च्या 1600 आणि बी.डी.एस. च्या 800 जागा आहेत. शुल्कवाढ मिळाल्याशिवाय यावर्षी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची तयारी नसल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन परिषदेतर्फे जाहीर झालेल्या प्रवेश यादीत फक्त सरकारी आणि महापालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रक्रियेत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावे लागतील. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संस्था चालकांनी अधिक शुल्कवाढीसाठी स्वीकारलेल्या धोरणामुळे, वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थी आणि पालकांची मात्र कोंडी झाली आहे. या प्रचंड शुल्कवाढीमुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणेच यावर्षी खाजगी
वैद्यकीय महाविद्यालयाकडे विद्यार्थी पाठ
फिरवण्याची शक्यता आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: