Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हुंडाविरोधी तक्रारीत तत्काळ अटक नको
ऐक्य समूह
Saturday, July 29, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: na2
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
5नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : हुंड्यासाठी छळ करण्यात येत असल्याच्या विवाहितांनी केलेल्या तक्रारींमध्ये त्यांच्या सासरच्या नातेवाइकांना तत्काळ अटक केली जाऊ नये. तक्रारीची शहानिशा आणि आरोप सिद्ध झाल्यानंतरच गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.
अनेकदा किरकोळ कारणां-वरून सासरच्या मंडळींना नाहक त्रास देण्यासाठीही या कायद्याचा उपयोग होत आहे. यावरही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.   
हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब कल्याण समितीची स्थापना करण्यात यावी. समितीने अहवाल दिल्यानंतरच या प्रकरणांमध्ये अटक करावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. अशा प्रकरणात विवाहिता जखमी झाली असेल अथवा हुंड्यासाठी छळ केल्याने तिने आत्महत्या केली असेल तर ते प्रकरण पूर्ण वेगळे असेल. अशा प्रकरणांमध्ये आरोपींना लगेच अटक करण्यात यावी. मात्र, केवळ हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार आल्यानंतर आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असे न्या. ए. के. गोयल आणि न्या. यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. अशा प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये समझोत्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी प्रतिष्ठित लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. हुंड्यासाठी होत असलेल्या छळाच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरणाने एक किंवा दोन कुटुंब कल्याण समित्या स्थापन कराव्यात. या समितीत तीन सदस्य असावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने या आधी 2014 मध्येही महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर संबंधित आरोपींना तत्काळ अटक करू नये. छळ होत असल्याचे सिद्ध झाल्यास अटक करावी, असे आदेश पोलिसांना दिले होते. सबळ पुरावे असल्यास आणि आरोपी फरार होण्याची शक्यता असल्यास अटक करावी, असेही न्यायालयाने म्हटले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: