Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

स्वदेशीच्या प्रसारकाचा गौरव
vasudeo kulkarni
Saturday, July 29, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: vi1
लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीच्या मूलमंत्राचा कृतिशीलपणे स्वीकार करून, सध्याच्या बहु-राष्ट्रीय कंपन्यांच्या  उत्पादनांना टक्कर देत स्वदेशी उत्पादनांची निर्मिती करणार्‍या पतंजली योग विद्यापीठाचे आचार्य बाळकृष्ण यांना पुण्याच्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिराने यावर्षीचा लो. टिळक पुरस्कार जाहीर केला, हा त्यांच्या स्वदेशीच्या कृतिशील प्रसाराचा सन्मान होय. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे. हरिद्वारच्या पतंजली योग विद्या-पीठाचे सर्वेसर्वा योगगुरू बाबा रामदेव यांचे ते सहकारी. तीस वर्षापूर्वी हरिद्वारच्या आश्रमात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी योगविद्येच्या प्रसाराची आणि आयुर्वेदाचे पुनरुज्जीवन करायची शपथ घेतली. वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवलेल्या आचार्य बाळकृष्ण यांनी प्रारंभीच्या काळात आश्रमात तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांचे वितरण सायकलवरून केले होते. आयुर्वेद शास्त्राच्या सखोल संशोधनाला आधुनिक विज्ञानाची जोड देत, त्यांनी आश्रमातच आयुर्वेदिक उत्पादनांना प्रारंभ केला. बाबा रामदेव यांच्या देशव्यापी योग शिबिरांमुळे, योग विद्येचा प्रसार झाला. निरामय आरोग्यासाठी योगविद्येची आराधना करणारी केंद्रे देशभरात सुरू झाली. पुढे हरिद्वार येथेच पतंजली दिव्य औषधालयाचा प्रारंभ झाला. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या आधारे दर्जेदार आणि आयुर्वेदशास्त्राच्या सूत्रानुसार विविध औषधांचे उत्पादन सुरू झाले. हरिद्वार येथे पतंजली योग विद्यापीठाच्या परिसरातच आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदाचे अत्याधुनिक रुग्णालयही सुरू केले. गेल्या काही वर्षात देशाच्या सर्व भागात पतंजलीची औषधे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावीत, यासाठी औषध विक्री केंद्रांची संख्या जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत नेण्यात आचार्य बाळकृष्ण यांना यश मिळाले आहे.  या केंद्रात तज्ञ वैद्यांच्याकडून मोफत वैद्यकीय तपासणी आणि सल्ला दिला जातो. देशातल्या ख्यातनाम आयुर्वेद औषधी निर्मितीच्या क्षेत्रात सध्या पतजंलीने आघाडी मिळवली आहे. पतंजली योग विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या आचार्य बाळकृष्ण यांचा आयुर्वेद, वेद, सांख्ययोग, संस्कृत उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचंड व्यासंग आहे. संस्कृत आणि योग विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या आचार्य बाळकृष्ण यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून 41 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. योग आणि आयुर्वेद या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘औषध दर्शन’ या पुस्तकाच्या 1 कोटीहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. आयुर्वेद आणि योगविद्येवरच्या त्यांच्या पुस्तकांचे बहुतांश भारतीय भाषात अनुवादही झाले आहेत. पतंजली संशोधन संस्था, पतंजली ग्रामोद्योग ट्रस्ट, पतंजली जैव संस्था, पतंजली फूड अँड हर्बल पार्क यासह हरिद्वार येथील अनेक संस्थांचे ते प्रमुख संचालक आहेत. या संस्थांद्वारे विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन केले जाते.  ‘योग संदेश’ या नियत-कालिकाचे संपादक असलेल्या आचार्य बाळकृष्ण यांनी हिमालयातल्या दुर्मीळ संजीवनीसह अनेक दुर्मीळ वनस्पतींचे संशोधन केले आहे. देशाच्या आरोग्य, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. ‘पतंजली’ या देश, विदेशात प्रसिद्ध असलेल्या नाममुद्रेच्या खाली जनतेसाठी उत्पादित होणार्‍या विविध संस्था आणि कंपन्यांचे मुख्य संचालकही आचार्य बाळकृष्ण हेच आहेत. स्वदेशी अर्थकारणाला त्यांनी दिलेल्या गतीच्या कार्याचा गौरव लोकमान्य टिळक पुरस्काराने होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: