Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारताकडे 498 धावांची भक्कम आघाडी
ऐक्य समूह
Saturday, July 29, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: sp1
लंकेला ‘फॉलो ऑन’ न देण्याचा निर्णय; परेराची झुंज
5गॉल, दि. 28 (वृत्तसंस्था) : पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी गोलंदाजांनी श्रीलंकेचा संघ 291 धावांमध्ये गुंडाळाल्यानंतरही यजमानांना फॉलोऑन न देण्याचा निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतला. त्यानंतर दिवसअखेरीस भारताने दुसर्‍या डावात 3 बाद 189 अशी मजल मारून श्रीलंकेवर 498 धावांची आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात भारताचे तीन गडी माघारी परतले. अभिनव मुकुंद आणि विराट कोहली यांनी संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे.
गोलंदाजांनी श्रीलंकेला 291 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर कोहलीने यजमानांना फॉलोऑन देण्याऐवजी दुसर्‍या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावातील शतकवीर शिखर धवन व चेतेश्‍वर पुजारा हे लवकर बाद झाल्यानंतर सलामीवीर अभिनव मुकुंद आणि विराट कोहली
यांनी तिसर्‍या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. गुणतिलकाने मुकुंदला पायचित केल्यावर तिसर्‍या दिवसाचा
खेळ थांबवण्यात आला. पहिल्या डावात निराशा करणार्‍या मुकुंदला दुसर्‍या
डावात सूर गवसला. त्याने 81 धावांची खेळी केली. खेळ संपला तेव्हा कोहली 76 धावांवर नाबाद होता. श्रीलंकेकडून दिलरुवान परेरा, लाहिरू कुमारा आणि धनुष्का गुणतिलका यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. आता चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात झटपट धावा करून कसोटी जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा पहिला डाव 291 धावांमध्ये आटोपला. कालच्या 5 बाद 154 धावसंख्येवरून लंकेचा डाव पुढे सुरू झाल्यावर अँजेलो मॅथ्यूज व दिलरुवान परेरा यांनी आणखी 51 धावांची भर घातली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. शतकाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या मॅथ्यूजला बाद करून रवींद्र जडेजाने भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. जडेजाला कव्हर्समधून फटकावण्याच्या प्रयत्नात मॅथ्यूजने कोहलीकडे झेल दिला. मॅथ्यूजने परेराच्या साथीत 62 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जडेजाने लंकेचा कर्णधार रंगना हेराथलाही माघारी धाडले. जडेजाला स्वीप करण्याच्या प्रयत्नात चेंडू हेराथच्या ग्लोव्हला चाटून उडाला. त्यावर अजिंक्य रहाणेने सोपा झेल घेतला. दोन फलंदाज झटपट माघारी परतल्याने लंकेचा डाव लगेचच आटोपणार, असे चिन्ह दिसत होते. मात्र, दिलरुवान परेराने भारतीय गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवून 132 चेंडूत 10 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. नुवान प्रदीप व लाहिरू कुमारा यांनी परेराला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिक पांड्याने प्रदीपचा त्रिफळा उडवून कसोटी कारकिर्दीतील आपला पहिला बळी नोंदवला. शेवटी जडेजाने कुमाराचा त्रिफळा उडवून लंकेचा डाव संपुष्टात आणला. असेला गुणरत्ने जायबंदी झाल्याने उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे लंकेला या कसोटीत फक्त 10 खेळाडूंसह खेळावे लागत आहे. कुमारा बाद झाल्याने 92 धावांवर नाबाद असलेल्या परेराची शतकाची संधी हुकली. भारताकडून जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. मोहम्मद शमीने दोन तर अश्‍विन, उमेश यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 309 धावांनी मागे पडल्यानंतरही कोहलीने त्यांना फॉलोऑन न देता दुसर्‍या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
धावफलक : भारत (पहिला डाव) : सर्वबाद 600.
श्रीलंका (पहिला डाव) : (5 बाद 154 वरून पुढे) अँजेलो मॅथ्यूज झे. कोहली गो. जडेजा 83, दिलरुवान परेरा नाबाद 92, रंगना हेराथ झे. रहाणे गो. जडेजा 9, नुवान प्रदीप त्रि. गो. पांड्या 10, लाहिरू कुमारा त्रि. गो. जडेजा 2, (असेला गुणरत्ने फलंदाजी करू शकला नाही) अवांतर 5, एकूण 78.3 षटकांत सर्वबाद 291.
गोलंदाजी : मोहम्मद शमी 12-2-45-2, उमेश यादव 14-1-78-1,
आर. अश्‍विन 27-5-84-1, रवींद्र
जडेजा 22.3-3-67-3, हार्दिक पांड्या
3-0-13-1.
भारत (दुसरा डाव) : शिखर धवन झे. गुणतिलका गो. परेरा 14, अभिनव मुकुंद पायचित गो. गुणतिलका 81, चेतेश्‍वर पुजारा झे. मेंडिस गो. कुमारा 15, विराट कोहली नाबाद 76, अवांतर 3, एकूण 46.3 षटकांत 3 बाद 189.
गोलंदाजी : नुवान प्रदीप 10-2-44-0, दिलरुवान परेरा 12-0-42-1, लाहिरू कुमारा 11-1-53-1, रंगना हेराथ 9-0-34-0, धनुष्का गुणतिलका 4.3-0-15-1.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: