Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

‘लालू’ना धोबीपछाड
vasudeo kulkarni
Friday, July 28, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: ag1
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि भ्रष्टाचार महर्षी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सत्तेसाठी गळ्यात बांधून घेतलेले लोढणे फेकून देत, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार अवघ्या 14 तासाच्या आत भारतीय जनता पक्षाशी युती करून बिहारचे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत आकंठ डुंबणार्‍या आणि त्याचे बेशरमपणे समर्थन करत, हे आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपण आणि आपल्या कुटुंबीयांना बदनाम करायसाठीच केलेले कटकारस्थान असल्याचा थयथयाट करणार्‍या लालूंनी आपल्या दिवटे चिरंजीव-माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव हे निष्कलंक असल्याचा कांगावा केला होता. लालूंच्या कन्या खासदार
डॉ. मिसा भारती, तेजस्वी आणि पत्नी, माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार, कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे घोटाळे सीबीआयने चव्हाट्यावर टांगल्याने, स्वच्छ प्रतिमा असलेल्या नितीशकुमार यांची आणि लालूंच्या राजदची सत्ताधारी महाआघाडी संकटात आली होती. तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची मागणी खुद्द तेजस्वी आणि लालूंनी जाहीरपणे फेटाळल्यावर, या सरकारच्या भवितव्याचे संकट अधिकच गडद झाले. नितीशकुमार यांनी या भ्रष्टाचाराबाबत तेजस्वी यादव यांनी जाहीरपणे उत्तर द्यावे, ही विनंतीही लालूंनी धुडकावून लावली. बुधवारी  दुपारी घोटाळ्यांचे स्पष्टीकरण देण्यास तेजस्वी यादव यांनी नकार दिल्याने नितीशकुमार यांचा संयम संपला. यापुढच्या काळात भ्रष्ट आणि घोटाळेबाज लालू आणि त्यांच्या पक्षाशी आघाडी करून सत्तेत राहणे म्हणजेच आपली राजकीय आत्महत्याच असल्याची पक्की खूणगाठ बांधूनच त्यांनी सायंकाळी तडकाफडकी संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाची तडकाफडकी बैठक घेऊन सायंकाळी सात वाजता राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामाही दिला. त्यांची ही कृती भारतीय जनता दलाच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या पक्षश्रेष्ठांना, नेत्यांना अपेक्षित असल्यानेच, नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच अवघ्या दहाच मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी त्यांचे ट्विटरवर हार्दिक अभिनंदन केले. ‘देशासाठी, विशेषत: बिहारच्या उज्वल भवितव्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराच्या विरोधात एकजुटीने लढा द्यायला हवा आणि ही काळाची गरज आहे’, अशा शब्दात मोदींनी नितीशकुमार यांच्या कृतीचे अभिनंदनही केले. काही झाले, तरी आपल्या पक्षाच्या पाठिंब्याशिवाय नितीशकुमार मुख्यमंत्रिपदावर राहू शकणार नाहीत आणि ते सत्ता सोडणार नाहीत, अशा भ्रमात असलेल्या लालूप्रसादांच्या पेकाटात या राजीनाम्याच्या घटनेने सणसणीत लाथ बसली आणि त्यांनी तातडीने राजदच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून, विधानसभेतल्या आपल्या सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळावे असा दावा राज्यपालांच्याकडे करायचा निर्णय घेतला. पण, त्यांची ही बैठक होण्यापूर्वीच भाजपने माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन राज्यपालांना, नितीशकुमार यांना सरकार स्थापनेसाठी आपल्या पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्रही दिले. परिणामी नव्या सरकारच्या स्थापनेत कोलदांडे घालायचे लालूंचे प्रयत्नही उधळले गेले आणि नितीशकुमार यांनी दिलेल्या धोबीपछाडाने ते चारी मुंड्या चीत झाले.

लालूंच्या दुकानाचे दिवाळे
243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दल 80, संयुक्त जनता दल 71, भाजप 58 आणि काँग्रेस 27, अन्य 7 असे बलाबल असल्याने, नितीशकुमार यांना सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या 122 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. भाजपने पाठिंबा दिल्याने ते मिळाले आणि गुरुवारी सकाळी दहा वाजता नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची तर सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने पूर्वी या राज्यात सत्तेवर असलेल्या संयुक्त जनता दल आणि भाजप युतीकडे पुन्हा एकदा सत्ता आली आहे. विधानसभेत या नव्या युतीचे सरकार सहजपणे बहुमत सिद्ध करील, अशी स्थिती असल्याने, लालूंच्या राज्यात अस्थिरता निर्माण होईल, नितीशकुमार यांनी विश्‍वासघात केला, पाठीत खंजिर खुपसला या असल्या भंपक आरोपात काही अर्थ नाही. वास्तविक विधानसभेच्या गेल्याा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या युतीचे सरकार सत्तेवर होते. या सरकारने केलेल्या लोकहितवादी आणि विकासाच्या कार्याने ते लोकप्रियही होते. पण, भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केल्यावर, धर्मनिरपेक्षतेच्या आरोळ्या ठोकत नितीशकुमार यांनी युती मोडली आणि लालू प्रसादांच्या पक्षाला मिठी मारून राजकीय आत्मघात ओढवून घेतला. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत या नव्या महाआघाडीला बहुमत मिळाले. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तरी लालूप्रसादांचे सत्ता गाजवायचे किळसवाणे उद्योग मात्र नव्याने सुरू झाले. या सरकारमध्ये आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी मंत्रिपदे दिली. पत्नी राबडीदेवी आमदार आणि कन्या राज्यसभेची खासदार अशा स्थितीने लालूंच्या कुटुंबाच्या दावणीलाच राष्ट्रीय जनता दल बांधला गेला. गेल्या दोन महिन्यात राबडी, तेजस्वी आणि मिसा या टोळक्याने राजधानी दिल्ली, पाटणा यासह देशाच्या विविध भागात केलेल्या बेनामी संपत्तीचा पंचनामा सुरू झाला. स्वच्छ आणि निष्कलंक प्रतिमेच्या नितीशकुमार यांची राजकीय फरपट सुरू झाली. लालूप्रसादांचे जोखड डोक्यावरून फेकून दिल्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव होताच त्यांनी तशी तयारी सुरू केली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला, तेव्हाच ते पुन्हा भाजपशी-मोदी यांच्या नेतृत्वाशी जुळवून घ्यायच्या, या पक्षाशी नवी आघाडी करायच्या तयारीत असल्याची चिन्हे होती आणि नेमके तसेच घडले. नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या स्थापनेचे स्वप्नही दाखवले गेले. पण, नितीशकुमार यांनी आपल्याला पंतप्रधान होण्याची आकांक्षा नाही, असे जाहीर करून महाआघाडीच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. तेव्हाच  लालू आणि काँग्रेसबरोबरची बिहारातली महाआघाडी मोडल्यास भाजप तत्काळ पाठिंबा देईल, असे वचन नितीशकुमारांना मिळाले असावे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आपली प्रतिमा अधिक उजळ तर करून घेतलीच, पण लालूंच्या कुटुंबियांच्या मागे घोटाळ्यांच्या प्रकरणांचा ससेमिरा लागलेला असतानाच त्यांच्या पक्षालाही खग्रास ग्रहण लावले आहे.                                                                    
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: