Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

हरितक्रांतीचे शिल्पकार
vasudeo kulkarni
Friday, July 28, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: vi1
आपल्या महिको कंपनीच्या संकरित बियाणाच्या उत्पादनाद्वारे देश आणि विदेशात नावलौकिक मिळवलेल्या डॉ. बद्रिनारायण बारवाले यांच्या निधनाने, देशाच्या हरितक्रांतीत महत्त्वाचे योगदान देणारा कृषी मित्र हरपला आहे. मराठवाड्यातल्या हिंगोली या गावात 27 ऑगस्ट 1930 रोजी जन्मलेल्या बारवाले यांचे जनक वडील जयकिशन कागलेवाल. भिकूलालजी बारवाले यांना बद्रिनारायण दत्तक गेल्याने ते बारवाले झाले. आपल्या दत्तक घरातून शिक्षण घेत असतानाच ते मराठवाडा मुक्ती संग्रामात सामील झाले. हैद्राबाद संस्थानातल्या निजाम सरकारच्या विरोधात झालेल्या सशस्त्र क्रांतीत ते सहभागी होते. निजामाच्या तुरुंगात त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास सोसावा लागला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ हे त्यांचे सहकारी होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर जनला तालुक्यातल्या बदनापूर या गावातल्या वडिलोपार्जित शेतीत त्यांनी आधुनिक शेतीचे नवे प्रयोग सुरू केेले आणि त्यातूनच पुढे संकरीत बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी (महिको) द्वारे त्यांनी ज्वारी, बाजरी, भेंडी, भुईमूग, कापूस यासह विविध धान्ये आणि भाजीपाल्याचे संकरित बियाणे विकसित केले. अधिक उत्पादन देणारी भेंडीची पुसासावनी ही जात त्यांच्याच कंपनीने विकसित केली आहे. 1967 मध्ये युरोप आणि अमेरिकेचा दौरा करून त्यांनी तिथल्या प्रगत शेतीचा अभ्यास केला.  आपल्या कंपनीतल्या बियाणांच्या संशोधनाला गती दिली. भारतात रोगप्रतिबंधक बीटी कापसाचे बियाणे त्यांनीच सर्वप्रथम उत्पादित केले होते.
बियाणांच्या उत्पादनाबरोबरच डॉ. बारवाले यांनी शेतीतल्या अधिक उत्पादनाच्या तंत्राचा मंत्र शेतकर्‍यांनी आत्मसात करावा यासाठी कंपनीद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रसाराचाही विभाग सुरू केला. त्यांच्या या अथक संशोधन आणि शेतीक्षेत्रातल्या विकासाची आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही दखल घेतली गेली. 1998 मध्ये त्यांना जागतिक स्तरावरच्या ‘अन्न पुरवठा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तमिळनाडू कृषी विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेटने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. केंद्र सरकारने पद्मभूषण किताबाने त्यांचा सन्मान केला होता.
प्रारंभीच्या काळात डॉ. बारवाले हे जालन्यात कापडाचे दुकान चालवित. संकरित बियाणांच्या क्षेत्रात शून्यातून प्रारंभ करत त्यांनी जगभर, महिको बियाणांचा दबदबा निर्माण केला. परदेशी बियाणांच्या उत्पादन कंपन्यांच्या स्पर्धेतही, त्यांची कंपनी टिकली आणि मोठीही झाली. या व्यवसायातून त्यांना प्रचंड अर्थप्राप्तीही झाली. या नफ्याचा वापर त्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि गरिबांच्या सेवेसाठी मुक्तपणे केला. औरंगाबादचे डॉ. हेगडेवार रुग्णालय, लातूरचे विवेकानंद रुग्णालय, गणपती नेत्र रुग्णालय, यासह अनेक शाळा-महाविद्यालयांना त्यांनी प्रचंड आर्थिक मदत केली होती. त्यांच्या निधनाने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: