Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

जागतिक तापमानवाढीचे दृष्य रूप
ऐक्य समूह
Thursday, July 27, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: st1
अंटार्क्टिकाचा एक प्रचंड मोठा हिमनग मुख्य समुद्रापासून तुटून विलग झाला आहे. नॅशनल जिऑग्राफिकने या संदर्भातील माहिती सातत्याने प्रकाशित केली होती. मोठा तडा गेला असल्याने हा हिमनग लवकरच तुटेल, असा धोक्याचा इशारा दिला होता. आता हा महाप्रचंड हिमनग तुटल्याने जागतिक तापमानवाढीचे परिणाम गंभीर होतील, असे पर्यावरण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे
अमेरिकेने पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे पर्यावरण रक्षणाविषयीची अमेरिकेची उदासीनता स्पष्ट झाली आहे. मुळातच जागतिक तापमानवाढ हा काही संशोधकांच्या मनातील भीतीचा बागुलबुवा आहे, असे मानणार्‍या शास्त्रज्ञांना गेली काही वर्षं या तापमानवाढीच्या भयावह परिणामांची अनेक उदाहरणे दिसून आली.  नंतर ही चर्चा थंडावली. मात्र अमेरिकेने ट्रम्प यांच्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत घेतलेली हटवादी भूमिका जगाला विध्वंसाच्या जवळ घेऊन जाईल असे वाटण्याजोगी घटना नुकतीच घडली. अंटार्क्टिकाच्या थराला तडे जात असून तेथील लार्सन सी समुद्रातील दोन हिमनग आतापर्यंत स्वतंत्र झाले होते. नुकताच आणखी एक हिमनग या समुद्रापासून तुटून अलग झाला. त्याचा आकार मुंबईच्या दहापट किंवा अमेरिकेच्या पूर्वेकडच्या डोलवेअर प्रदेशाएवढा असल्यामुळे संशोधकांच्या मनात सजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या प्रश्‍नावरून भीती निर्माण झाली आहे.
महाप्रचंड हिमनग
जागतिक तापमानवाढ हा गेली काही वर्षं ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. ध्रुवीय प्रदेशातील ओझोनच्या थराला छिद्र पडल्याचे दिसून आल्यानंतर त्या भागात हानिकारक अतिनील बी किरणांमुळे होणार्‍या जीवसृष्टीची हानी हा सुमारे 25 वर्षांपूर्वी मोठ्या चर्चेचा विषय बनला होता. त्वचेच्या कर्करोगापासून जनुकीय किंवा अनुवंशिक आजारांपर्यंत आणि व्यंगे असलेली अर्भके जन्मण्यापर्यंतचे अनेक भयावह दुष्परिणाम त्या भागात दिसून आल्यानंतर तर पर्यावरण संरक्षणाची अतीव गरज अधोरेखित झाली होती. अंटार्क्टिकाच्या या अलग झालेल्या हिमनगाचे वजन एक लाख कोटी टन एवढे प्रचंड असून त्याचा आकार सुमारे पाच हजार 800 चौरस किलोमीटर आहे. हा अंटार्क्टिकाच्या लार्सन आईड्स शेल्फचा तुकडा आहे. अंटार्क्टिकाला आधीही काही तडे पडले होते. परंतु त्या सर्वांमध्ये हा सर्वाधिक मोठा तडा आहे. अशाप्रकारे अंटार्क्टिकाचे तुकडे पडले तर नेमकं काय होईल, याविषयीच्या संशोधनाला सध्या गती आली आहे. यंदाच्या जुलै महिन्याच्या नॅशनल जिओग्राफिकच्या अंकात अंटार्क्टिकावरची चित्तथरारक माहिती प्रसिद्ध झाली आहे.
जहाजासाठी धोकादायक
दहा ते बारा जुलै दरम्यान हिमनग तुटण्याची ही घटना घडली असून युनिव्हर्सिटी ऑफ स्वॅनसी आणि ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे यांनी ती जाहीर केली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या उपग्रहाच्या साहाय्याने संशोधक याच्या परिणामांचा अभ्यास करत आहेत. हा हिमनग तुटल्यामुळे अंटार्क्टिकासह इतर सर्वच भागांमधील भूस्थैर्य नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच या परिसरातील बर्फाचं आच्छादन दर वर्षी नऊ टक्क्यांनी कमी होत आहे. त्यामुळे यापुढे अलग होणार्‍या हिमनगांची संख्या जास्त असणार आहे. शिवाय हे फक्त अंटार्क्टिकाच्या बाबतीतच घडत नसून आर्क्टिक प्रदेशातही असेच गंभीर परिणाम दिसून येत आहेत. डायमोर 1 या उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांवरून हा हिमनग आता अंटार्क्टिका प्रदेशातून मंद गतीने सरकत बाहेर पडू लागल्याचं दिसत आहे. त्याच्या पोटातील स्वच्छ पाण्याचे आकारमान वेल्सच्या पावपट असल्याचं दिसत आहे. हे हिमनग काही दशकंही आपल्या जागेवर तसेच स्थिर राहू शकतात, कारण ते सागरी तळावरच्या काही छोट्या टेकड्यांवर विसावलेले असतात. मात्र या हिमनगाचे असंख्य तुकडे होऊ शकतात असेही संशोधकांना वाटते. त्या परिस्थितीत हे छोटे तुकडे वहात दूरवर पसरतील आणि नेमका शोध घेता न आल्यामुळे जहाजांसाठी मोठे धोकादायक ठरतील.
निखळलेल्या हिमनगाला संशोधकांनी ‘ए 68’ असे नाव दिले आहे. 2000 मध्येही असाच प्रचंड मोठा हिमनग तुटून बाहेर पडला होता. त्या पाठोपाठ हा हिमनग तुटल्यामुळे हिमनग तुटण्याची वारंवारताही वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या या हिमनगाची आगेकूच संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेने सुरू झाल्याचा अंदाजही शास्त्रज्ञांच्या एका गटाने वर्तवला आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’ने तर श्रीमंत देशांनी महामूर्खपणानं केलेल्या प्रदूषणाची किंमत गरीब देशांना चुकवावी लागत असल्याचा निष्कर्ष या घटनेवरून काढला आहे. खरे तर ‘नेचर’ या नियतकालिकात 40 वर्षांपूर्वीच जॉन मर्कर या प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञाने या धोक्याची जाणीव करून दिली होती. त्यांनी आगामी 50 वर्षांमध्ये होणार्‍या तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकाचे तुकडे पडू लागतील, असा इशारा दिला होता. परंतु त्यावेळी काही संशोधकांनी आणि राजकीय तज्ज्ञांनी अवास्तव भीती म्हणून त्यांच्या या अनुमानाकडे दुर्लक्ष केले होते. परंतु आता त्यांचे हे भाकीत खरे ठरत असल्याचे दिसू लागले आहे.
प्रलयाला आमंत्रण
स्वानसी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक अ‍ॅड्रियान लुकमन यांच्या मते, हा हिमनग एकसंध न राहता त्याचे तुकडे झाले तर काही तुकडे उबदार पाण्याच्या दिशेने उत्तरेकडे वाहू लागतील. याचा धोका जहाजांना असेल. हा भाग प्रमुख व्यापारी जलमार्गांहून दूर असला तरी दक्षिण अमेरिकेत येणार्‍या जहाजांना याचा प्रामुख्याने धोका संभवतो. 2007 मध्ये एम एस एक्सप्लोरर हे जहाज अशाच प्रकारे एका हिमनगावर आदळून बुडाल्या-नंतर त्यावरच्या 150 प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.  याआधीच अंटार्क्टिक पेनिन्सुलाच्या उत्तरेकडे असलेले लार्सन ए आणि बी हिमनग अशाच प्रकारे 1995 आणि 2002 मध्ये कोसळले होते. त्यावेळी त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या हिमनद्यांमध्ये प्रचंड गतीचे प्रवाह निर्माण झाले होते. आता लार्सन सीच्या पडझडीस सुरुवात झाली आहे.
ध्रुवीय प्रदेशांचा आणि आपल्या सागरांचा आणि वातावरणाचा परस्परांवर परिणाम होतो. मात्र पश्‍चिम अंटार्क्टिका भागात अधिक जलद गतीने जागतिक तापमानवाढीचा परिणाम होत असल्याचे गेल्या काही दशकांमध्ये दिसून आले आहे. पेंग्विनसारख्या प्रजातींसाठी हे बदल चांगले नाहीत. अशा काही प्रजाती नामशेष होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. यासाठीच कार्बन उत्सर्जनात झपाट्याने घट करण्याला पर्याय नाही. अमेरिकेने पॅरिस कराराकडे फिरवलेली पाठ या दृष्टीने मानवी भवितव्यासाठीच अत्यंत धोकादायक ठरणार आहे. महासत्तेच्या या बेजबाबदारपणावर सध्या युरोपियन देशांसह जगभरातून टीकेची झोड उठत आहे ती त्यामुळेच. एकूणच, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे तात्पुरती प्रगती करून घेत असताना आपण कायमस्वरूपी प्रलयाला आमंत्रण देत आहोत, असा इशारा अंटार्क्टिकाच्या या घटनेने दिला आहे. यानंतर अमेरिकेने आपल्या धोरणाचा फेरविचार करावा अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
    - ओंकार काळे
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: