Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

सात फुटीरतावाद्यांना अटक
vasudeo kulkarni
Thursday, July 27, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: vi1
पाकिस्तानच्या चिथावण्या आणि आर्थिक सहाय्याच्या बळावर काश्मीर खोर्‍यातल्या दहशतवादी कारवायांना जबाबदार असलेल्या हुर्रियत परिषदेचे नेते सय्यद अलिशहा गिलानी यांच्यासह 7 फुटीरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. या सर्व सातही जणांना तपासासाठी न्यायालयाने 18 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केल्याने फुटीरता-वाद्यांना हादरा बसला आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार, सामूहिक कत्तलींसह दहशतवादाचा प्रसार करण्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे अनेक पुरावे गुप्तचर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी जाहीर केले होते. या फुटीरतावादी नेत्यांना पोलीस नजरकैदेतही ठेवत असत. पण, 27 वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात दहशतवाद सुरू झाल्यावर, राष्ट्रीय तपास संस्थेने या राज्यात जाऊन कारवाई केल्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या पाच वर्षात पाकिस्तानकडून होणार्‍या पैशाच्या पुरवठ्यामुळेच, सुरक्षा दलांच्या तुकड्या आणि पोलिसांवर दगडफेकीचे नवे सत्र सुरू झाले. या भाडोत्री युवकांना पोलिसांवर दगडफेक करायसाठी रोज पाचशे रुपये मजुरी दिली जात असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले होते. एका दहशतवादी संघटनेच्या नेत्याने आपल्याला पाकिस्तानकडून आर्थिक मदत मिळत असल्याच्या दिलेल्या कबुली जबाबाची चित्रफित वृत्त वाहिन्यांवर प्रक्षेपित झाल्यामुळे, केंद्रीय तपास संस्थेने गुन्हा नोंदवून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि 7 फुटीरतावाद्यांना अटकही केली. या फुटीरतावाद्यांना गेल्या 20 वर्षात पाकिस्तानकडून हजारो कोटी रुपये मिळाले असावेत, असा संशय आहे. दहशतवाद्याचा म्होरक्या बुर्‍हाण वणीला सुरक्षा दलांनी ठार केल्यावर काश्मीर खोर्‍यात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा वणवा पेटला. शाळांना आगी लावण्यात आल्या. या हिंसक कारवायांसाठी पाकिस्तानने हवाला मार्फत पैसे पुरवल्याचे निष्पन्न झाले आहे. गिलानी यांचे सहकारी तहरिक ए हुर्रियतचे प्रवक्ते आयाज अकबर आणि पीर सैफुल्ला, हुर्रियत परिषदेच्या मिरवाईज, उमर फारूख गटाचे प्रवक्ते शाहीद उल इस्लाम या नेत्यांना अटक करून केलेल्या तपासात, यातल्या काही नेत्यांचे लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी नेत्याशी संबंध असल्याचे पुरावेही तपास संस्थेने जप्त केले आहेत. या सातही नेत्यांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे करून, अधिक तपासासाठी मागितलेली पोलीस कोठडी मंजूर झाली.
22 जून रोजी श्रीनगरमधल्या जमिया मशिदी बाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी उभ्या असलेल्या
पोलीस उपअधीक्षक महंमद आयुब पंडित यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. पंडित यांच्यावर जमावाने अचानक हल्ला करून केलेल्या जबर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यांना मारहाणी-साठी वापरलेली लोखंडी सळई, पंडितांचे ओळखपत्र, मोबाईल फोन, पिस्तूल हे महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. या खुनाच्या प्रकरणी या घटनेच्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच पोलिसांना सहाय्य केल्यामुळे या खुनाचा तपास जलद गतीने सुरू असल्याचे पोलीस महासंचालक मुनीर खान याने सांगितले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: