Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

महापुराचा विळखा
vasudeo kulkarni
Wednesday, July 26, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: vi1
मान्सूनचा पाऊस गुजरात राज्यात वेळेवर झाला नसल्याने सोयाबीन, कापूस, भुईमुगाच्या पेरण्या वाया जायचे संकट निर्माण झाल्याने राज्य सरकार आणि शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. पण, जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून या राज्याच्या सर्व भागाला मान्सूनच्या तुफानी पावसाने झोडपून काढल्याने, नद्यांना आलेल्या महापुराचा विळखा अनेक शहरे आणि हजारो खेड्यांना बसला आहे. सौराष्ट्रात नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. पण, यावेळी मात्र सौराष्ट्रातल्या मोरबी जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाखा दिला. बनासकाठा, साबरकाठा आणि दक्षिण गुजरात विभागातल्या वैसाड, बलसाड या जिल्ह्यांना नद्यांच्या महापुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. राजधानी अहमदाबादसह काही भागात एका दिवसात अडीच ते तीन इंच तर काही भागात 24 तासात 8 ते 10 इंच असा विक्रमी पाऊस झाल्याने, शहरी भागातही रस्त्यावरून दीड दोन फूट उंचीच्या पाण्याचा प्रवाह वहायला लागला. शहराच्या अनेक वसाहतीत महापुराचे पाणी घुसले. मोरवी जिल्ह्यातली मच्छू एक आणि दोन ही दोन्ही धरणे भरल्याने, सुरक्षिततेसाठी धरणांची दारे उघडून नदीच्या पात्रात पाणी सोडल्याने, महापुराचे संकट अधिकच गंभीर झाले. बनासकाठा जिल्ह्यातल्या बहुतांश नद्यांच्या महापुराचे पाणी पात्राबाहेर पडल्याने या शहरासह शेकडो गावे जलमय झाली आहेत. रेल नदीचे पाणी धानेरा शहरात घुसल्याने, रहिवाशांनी आपल्या घरांच्या छपरांचा आश्रय घेतला. या राज्यातले 19 राज्यमार्ग आणि 102 रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने, रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद पडली आहे, तर हजारो वाहने महापुराच्या पाण्यात बुडाली आहेत. पाऊस आणि महापुराने या राज्यात 72 जणांचे बळी घेतले आहेत. प्रशासनाने महापुराच्या संकटात सापडलेल्या तीस हजार लोकांची सुटका करायसाठी केंद्रीय आपत्ती निवारण पथक आणि हवाई दल लष्कराची मदत घेतली. राज्यातल्या बहुतांश भागातल्या शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. पुराच्या विळख्यात सापडलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या लाखो लोकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे हवाई दलाच्या सहाय्याने पुरवठा करायचे काम वेगात सुरू आहे.
मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून, प्रशासनाला मदतकार्यात कोणत्याही उणिवा राहू नयेत, असे आदेश दिले आहेत. राज्यातला सर्व व्यापार पुराने ठप्प झाला आहे. अनेक रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने प्रवासी आणि माल रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सौराष्ट्रातल्या काही भागाचा बाह्य जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
महापुराने लाखो हेक्टर क्षेत्रातली कापूस, भुईमूग आणि सोयाबीनची पिके वाहून गेल्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यापार्‍यांचे झालेले नुकसानही प्रचंड आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: