Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

बुडत्याचा पाय...
vasudeo kulkarni
Monday, July 24, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: ag1
सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहणे म्हणजे राजकीय आत्महत्या होय, असे जाहीरपणे सांगणार्‍या दिग्गज राजकारणी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने, गुजरात राज्यात काँग्रेस पक्षाची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे. गेले सहा महिने वाघेला यांनी पक्ष श्रेष्ठींच्या कारभारावर सडकून टीका करीत, जोरदार हल्ले चढवायचे सत्र सुरु ठेवले होते. उंबरठ्यावर आलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी बंडाचा झेंडा फडकवत पक्षश्रेष्ठींनाच आव्हान दिल्याने, त्याचे पडसाद पक्षांतर्गत संघर्ष अधिकच पेटण्यात झाले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खुद्द वाघेला आणि त्यांच्या सात समर्थकांनी केंद्रातल्या सत्ताधारी आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करून, पक्षाचा आदेश धाब्यावर बसवला होता. पक्षाचा आदेश धाब्यावर बसवल्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी वाघेला यांच्यावर तडकाफडकी शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली तर, आपल्या 77 व्या वाढदिवसाच्या समारंभात वाघेला यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडल्याची घोषणा आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात केली. याच मेळाव्यात शंकर-सिंह वाघेला उर्फ बापूंनी, पक्ष सोडता सोडता पक्षाच्या नेतृत्वावरही घणाघाती हल्ले चढवले. त्यांना त्यांच्या समर्थक आमदारांसह पक्षातून काढून टाकल्याने पक्ष संघटनेवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा गुजरात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जयंत पटेल यांनी केला असला तरी, वास्तव मात्र तसे नाही. 1995 पासून या राज्यातल्या सत्तेपासून बाजूला फेकल्या गेलेल्या काँग्रेस पक्षाची सातत्याने सुरु असलेली घसरण थांबलेली नाही. भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या याच वाघेला यांनी आपल्या व्यापक जनसमर्थनाच्या बळावर या पक्षाला नवसंजीवनी द्यायचा प्रयत्न केला होता. पण, ज्या नरेंद्र मोदींना त्यांनी गुजरातच्या सक्रिय राजकारणातून एक काळ बाहेर काढले, तेच मोदी या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर वाघेला यांच्या नेतृत्वाला आणि काँग्रेसला  लागलेले खग्रास ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. काँग्रेसची जोरदार पिछेहाट होत असताना पक्ष संघटन अधिक मजबूत करायच्या ऐवजी वाघेला यांच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करणार्‍या कारवाया पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव अहमद पटेल यांनी सातत्याने सुरुच ठेवले आणि त्यांच्या या एकाधिकारशाहीला वैतागलेल्या वाघेला यांनी बंडाचा झेंडा फडकावत आता खुद्द अहमद यांचीच राज्यसभेचे सदस्यत्व धोक्यात आणणारी अचूक खेळी केली आहे. गुजरात राज्यातून राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत सोनिया गांधींचे विश्‍वासू सहकारी अहमद पटेल हे पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असले तरी, वाघेला यांच्या आव्हानामुळे ते निवडून यायची शक्यता नाही. गुजरात विधानसभेतल्या काँग्रेसच्या 57 पैकी 45 आमदारांची मते विजयासाठी मिळवणे अहमद यांना आवश्यक असले तरी, वाघेला आपल्या समर्थक आमदारांना पक्षादेश धुडकवायला लावून, अहमद पटेल यांना पराभवाची धूळ चारायच्या  जय्यत तयारीत असल्याने, हे बंड काँग्रेसला महागात पडण्याची
शक्यता आहे.

संधिसाधू नेतृत्व
शंकरसिंह वाघेला गेले 20 वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण त्या आधी त्यांची राजकीय जडण घडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर जनसंघात झाली होती. संघाचे प्रचारक लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकिलसाहेब आणि काशीनाथ बागडे यांनी वाघेला यांना जनसंघाच्या राजकारणात नेले. कुशल संघटक असलेल्या वाघेला यांनी अल्प काळातच गुजरात राज्यातल्या जनसंघाच्या पक्ष संघटनेत आपल्या नेतृत्वाचा दबदबा निर्माण केला. 1980 ते 1991 या काळात ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. 1995 मधल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 121 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले तेव्हा, निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांची मुख्यमंत्रिपदा-साठी वाघेला यांनाच पसंती होती. पण, पक्षश्रेष्ठांनी केशुभाई पटेल यांनाच हे पद दिले तेव्हाच पक्षसंघटनेत संघर्षाची पहिली ठिगणी पडली आणि पुढे वाघेला यांनी पटेल यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारत आपल्या पक्षाचे सरकारही धोक्यात आणण्याचा राजकीय तमाशा केला होता. पक्षश्रेष्ठींनी पटेल आणि वाघेला यांच्यातला सत्तासंघर्ष संपवायचा केलेले प्रयत्न सफल झाले नाहीत. वाघेला यांनी अवघ्या दोनच वर्षात पुन्हा बंडाचा झेंडा उभारत आपल्या समर्थक आमदारांसह भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रीय जनता दल असा नवा पक्ष काढला. अल्पमतातले भाजपचे सरकार पडल्यावर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मुख्यमंत्रिपदही मिळवले. पण, अल्पावधीतच या पक्षातल्या सत्ता संघर्षाचा तडाखा वाघेला यांनाही बसला. त्यांचे औट घटकेचे मुख्यमंत्रिपद गेले. पण, काँग्रेस पक्षात त्यांचे राजकीय वर्चस्व मात्र सातत्याने वाढत गेले. 2004 मध्ये कापडवंज मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या वाघेला यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये वस्त्रोद्योग खात्याचे मंत्रिपद मिळाले होते. 2012 मध्ये याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले वाघेला विरोधी पक्षनेते झाले. 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीत साबरकाठा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकात पराभव झाला तरी, वाघेला यांची लोकप्रियता मात्र कायम राहिली. गुजरात राज्याच्या सत्तेवर मुख्यमंत्री असताना मोदींनी, वाघेला आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला निष्प्रभ केले. ते पंतप्रधान झाल्यावर तर गुजरातमधल्या   उरल्या सुरल्या काँग्रेसच्या नेत्यांना निराशेने झपाटले. 2012 मधल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून ऐनवेळी उमेदवारांची नावे बदलण्याच्या प्रकारावरही तेव्हा वाघेला यांनी कडाडून टीका केली होती. पक्षश्रेष्ठींच्या सततच्या हस्तक्षेप आणि पक्षांतर्गत गटबाजीच्या वणव्यात तेल ओतण्याच्या उद्योगानेच या राज्यातल्या काँग्रेसचे वाटोळे झाल्याचे जाहीर आरोप वाघेला यांनी सातत्याने केले होते. आता वाघेला यांनीच पक्ष सोडल्यामुळे या राज्यात त्यांच्या इतकी लोकप्रियता आणि संघटनकौशल्य असलेला नेताही नाही. विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असा त्यांचा आग्रह पक्षश्रेष्ठींनी धुडकावून लावल्यानेच, वाघेला यांनी या राज्यातून काँग्रेसला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा निर्धारच केला आहे. सध्या आपण कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले असले तरी, ते पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतू शकतात. काही झाले तरी, या राज्याची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसला जिंकता येणार नाही, हेच संधीसाधू-स्वार्थी आणि सत्ताकांक्षी वाघेला यांनी पक्ष सोडल्याने स्पष्ट झाले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: