Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सोमवारपासून सुरुवात होत असून या अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे. केंद्र सरकारने ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीसाठी केलेली घाई, काश्मीरमधील हिंसक परिस्थिती, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला, चीनशी डोकलाम भागात सुरू असलेला संघर्ष, गोरक्षणाच्या नावाखाली देशभरात होत असलेल्या हत्या आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन विरोधकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. कथित गोरक्षकांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी या बैठकीत दिली असली तरी अधिवेशनात सरकारला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, हे निश्‍चित आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार असून या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या 19 बैठका होतील. गोमांस बाळगल्याच्या कारणावरून आणि कथित गोरक्षणाच्या नावाखाली देशभरात होत असलेल्या हत्या, ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेत उडालेला गोंधळ, काश्मीरमधील हिंसा, वाढता दहशतवाद, चीनबरोबरचा डोकलामधील संघर्ष, तृणमूल काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाया, या मुद्द्यांवरून या अधिवेशनात विरोधक तीव्र संघर्ष करण्याची शक्यता आहे. तशी रणनीती विरोधकांनी आखली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.
त्याचबरोबर नुकतेच दिवंगत झालेले राज्यसभेचे दोन सदस्य पल्वई गोवर्धन रेड्डी व माजी केंद्रीय मंत्री अनिल माधव दवे, गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व अभिनेते विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज संपेल. त्यामुळे अधिवेशनाला खर्‍या अर्थाने मंगळवारपासून सुरुवात होईल. विरोधी पक्षांची उद्या (सोमवार) महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यामध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या अधिवेशनात जवळपास दोन डझन महत्त्वपूर्ण विधेयके दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करून घेण्यासाठी सरकारला विरोधकांचे सहकार्य आवश्यक आहे. मात्र, सद्य स्थिती पाहता हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच या अधिवेशनातही काहीही कामकाज होण्याची शक्यता दिसत नाही. सरकारने दोन दिवस विरोधी पक्षांच्या बैठका घेऊन त्यांना काश्मीरमधील परिस्थिती आणि चीनबरोबरच्या संघर्षात सरकारकडून सामंजस्याची भूमिका घेतली जात असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्ष अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. ही एकजूट अधिवेशनातही कायम ठेवण्याचा विरोधकांचा निर्धार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: