Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जाधव यांच्या दया याचिकेवर विचार सुरू
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: mn2
पाक लष्करप्रमुख पुराव्यांचे विश्‍लेषण करणार
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : बलुचिस्तानमधील कथित हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांनी केलेल्या दया याचिकेवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा हे विचार करत आहेत, अशी माहिती पाक लष्कराकडून रविवारी देण्यात आली. जाधव यांच्याविरुद्ध सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचे विश्‍लेषण करून लष्करप्रमुख त्यावर निर्णय घेतील, असे पाककडून सांगण्यात आले.
कुलभूषण जाधव यांच्या दया याचिकेवर जनरल बाज्वा हे लवकरात लवकर निर्णय घेतील. हा निर्णय प्रकरणाच्या गुणावगुणांवर अवलंबून असेल, असे पाकिस्तानी लष्कराच्या प्रसिद्धी सेवेचे (इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स) महासंचालक व लष्करप्रमुखांचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पाकिस्तानच्या ‘आएसपीआर’ने या संदर्भात 22 जून रोजी निवेदन जारी केले होते. जाधव यांची दया याचिका पाकच्या अपिलीय न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळल्यानंतर त्यांनी जनरल बाज्वा यांच्याकडे दया याचिका दाखल केल्याचे या निवेदनात म्हटले होते.
जाधव यांचा कथित हेरगिरी प्रकरणात आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपांखाली पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल महिन्यात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भारताने नेदरलँडस्मधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मे महिन्यात या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली.  जाधव यांनी इराणमधून बलुचिस्तानमध्ये बेकायदेशीर मार्गाने प्रवेश केल्यानंतर त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने सातत्याने केला आहे. मात्र, भारताने पाकचा हा दावा प्रत्येक वेळी खोडून काढला आहे. जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर इराणमध्ये व्यवसाय करत होते. त्यांचे इराणमधून अपहरण करून खोट्या आरोपांखाली शिक्षा सुनावण्यात आल्याच्या म्हणण्यावर भारत सरकार ठाम आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: