Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कथित गोरक्षकांवर कठोर कारवाई करणार
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: na2
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : गायींच्या रक्षणाच्या नावाखाली हिंसा करणार्‍या कथित गोरक्षकांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. गोरक्षणाच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून गोरक्षकांकडून होत असलेल्या हत्या, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि चीनसोबत डोकलाम येथे सुरू असलेला संघर्ष यावरून या अधिवेशनात सरकारला जेरीस आणण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. मात्र, या अधिवेशनात अनेक विधेयके मांडण्यात येणार असून ती मंजूर होण्यासाठी सरकारला विरोधकांचे सहकार्य अपेक्षित आहे. 
या पार्श्‍वभूमीवर मोदींनी आज सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी पत्रकारांना दिली. गोरक्षणाच्या मुद्द्याला राजकीय अथवा धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. गाय ही माता असल्याचा सार्वत्रिक विश्‍वास आहे. मात्र, गोरक्षणाच्या नावाखाली कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा घडवणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. या बैठकीत मोदींनी ईशान्य भारतातील पूरस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले असून त्यामध्ये विरोधकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन मोदींनी केल्याचे अनंतकुमार यांनी सांगितले. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य केल्याबद्दलही मोदींनी सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले. सहकारी संघराज्य पद्धतीचे हे लखलखीत उदाहरण आहे, असे वर्णन मोदींनी केले. वेळे आधी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने पावसाळी अधिवेशनापूर्वीच एकूण खर्चाच्या 30 टक्के आणि पायाभूत सुविधांवरील 49 टक्के रक्कम खर्च करण्यास सुरुवात झाल्याचेही मोदींनी निदर्शनास आणून दिले. जम्मू-काश्मीरमधील हिंसक परिस्थिती आणि चीनबरोबर डोकलाम येथे सुरू असलेल्या संघर्षाबाबत सरकारने सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकांमध्ये माहिती दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या या मुद्द्यांवर सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची हमी विरोधी पक्षांनी दिली आहे, अशी माहितीही अनंतकुमार यांनी दिली. या बैठकीस राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे नेते मुलामयसिंग यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा उपस्थित होते. मात्र, संयुक्त जनता दल व तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. पश्‍चिम बंगालमधील  हिंसाचार आणि शारदा चिट फंड प्रकरणी सीबीआयने तृणमूलच्या नेत्यांवर केलेली कारवाई यामुळे या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने आधीच जाहीर केला होता.
कलंकित नेत्यांना बाजूला सारा
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सुरू असलेल्या कारवायांना राजकीय कटाचा रंग देणार्‍यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केले. भ्रष्टाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाया राजकीय सूडापोटी असल्याचा आरोप या पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर केला आहे. मोदींच्या या वक्तव्याचा रोख या पक्षांकडे आहे, हे उघड आहे. राजकीय पक्षांनी आपल्यातील कलंकित नेत्यांना शोधून त्यांना बाजूला सारले पाहिजे. ज्यांनी देशाची लूट केली, त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. या कारवाया म्हणजे राजकीय  कट असल्याचा आरोप करणार्‍यांच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. काही भ्रष्ट राजकारण्यांमुळे गेल्या काही दशकांत राजकीय वर्गाची प्रतिमा मलीन झाली आहे. सर्वच राजकीय नेते कलंकित नाहीत, अशी हमी जनतेला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: