Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: mn1
कोविंद यांचे पारडे जड; विरोधकांना मतफुटीची भीती
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : देशाचे 14 वे राष्ट्रपती निवडण्यासाठी उद्या (सोमवार) मतदान होत असून या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाहीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या उमेदवार व लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीसाठी लोकसभा व राज्यसभेचे खासदार आणि सर्व राज्यांच्या विधानसभा व केंद्रशासित प्रदेशातील आमदार मतदान करणार आहेत. सर्व मतांचे एकूण मूल्य 10 लाख 98 हजार 903 आहेत. रामनाथ कोविंद व मीराकुमार हे दोन्ही दलित समाजातील उमेदवार असले तरी या निवडणुकीत कोेविंद यांचे पारडे जड आहे. ते 63 टक्के मते मिळवतील, असा अंदाज आहे.
या निवडणुकीत विरोधकांची मते फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात येत असताना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतपत्रिकांद्वारे मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा सचिवालायाचे महासचिव अनुप मिश्रा हे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात असून प्रत्येक राज्यात सहाय्यक निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे निरीक्षकही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रथमच कोणीही विरोधी उमेदवारावर दिशाहीन टीका केलेली नाही किंवा अनाठायी वाद निर्माण केलेला नाही. या निवडणुकीत राष्ट्रपतिपदाची प्रतिष्ठा पूर्णपणे जपण्यात आली आहे, असे मोदींनी म्हटले आहे. काँग्रेसने मात्र ही संकुचित प्रवृत्तींच्या विरोधातील लढाई असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यामध्ये बोलताना सोनिया गांधी यांनी ही निवडणूक संकुचित प्रवृत्तीच्या जातीयवादी विचारांच्या विरोधातील लढाई असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत संख्याबळ भलेही विरोधी पक्षांच्या बाजूने नसले तरी ही लढाई पूर्ण ताकदीने लढली पाहिजे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींकडून राज्यघटना आणि कायद्याची प्रतिष्ठा सांभाळणे अपेक्षित आहे.  
दुर्दैवाने सध्या या दोन्हीवर घाला घालण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांनी सदसद्विवेकबुद्धीने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसर, केंद्रशासित प्रदेश व राज्यांच्या विधानसभांमध्ये सोमवारी सकाळी 10 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे. खासदारांसाठी हिरव्या रंगाची तर आमदारांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे. 20 जुलै रोजी मतमोजणी आणि सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल 25 जुलै रोजी संपुष्टात येणार असून चार दिवस आधीच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नवे राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदाची सूत्रे स्वीकारतील. खासदारांसाठी संसद भवनातील खोली क्रमांक 62 मध्ये मतदान होणार आहे. खासदारांना त्यांच्या राज्याच्या प्रतिनिधित्वानुसार नेमून देण्यात आलेल्या सहा टेबलांवर मतदान करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करत असल्याने ते सहाव्या क्रमांकाच्या टेबलवर मतदान करणार आहेत. दिल्लीत मतदान करण्यास पसंती देणार्‍या आमदारांना पहिल्या क्रमांकाच्या टेबलवर मतदान करता येईल. या मतदानासाठी खासदार किंवा आमदारांना स्वत:बरोबर पेन व मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पुरविलेल्या विशिष्ट पेननेच त्यांना मतदान करता येणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा घेत आघाडी घेतली होती. मात्र, भाजपने एकतर्फीच उमेदवार घोषित केल्याने सुरुवातीलला रालोआच्या घटक पक्षांमध्ये थोडी नाराजी होती. ती दूर करण्यात भाजपला यश आले आहे. रालोआतील शिवसेना, शिरोमणी अकाली दल, लोकजनशक्ती पक्ष यासह सर्व घटक पक्षांची एकगठ्ठा मते कोविंद यांच्या बाजूने पडतील, यात शंका नाही. त्याचबरोबर विरोधी पक्षांमधील संयुक्त जनता दल (1.91 टक्के मते), बिजू जनता दल (2.99 टक्के मते), वायएसआर काँग्रेस (1.53 टक्के मते), तेलंगण राष्ट्र समिती (2 टक्के मते), अण्णाद्रमुक (5.39 टक्के मते) यांनी कोविंद यांना पाठिंबा दिल्याने कोविंद यांना एकूण 63 टक्के मते मिळतील, हे निश्‍चित झाले आहे. उर्वरित विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या उमेदवार मीराकुमार यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षात या निवडणुकीवरून दोन गट पडले आहेत. मुलायमसिंग यांच्या नेतृत्वखालील गट कोविंद यांना मतदान करणार आहे. आम आदमी पक्षाने मीराकुमार यांना पाठिंबा दिला असला तरी त्यांचे पंजाबमधील नेते एच. एस. फुलका यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. 1984 साली देशात शिखांविरुद्ध झालेल्या दंगलींमध्ये काँग्रेस नेत्यांचा हात असून या खटल्यात आपण त्यांच्याविरोधात लढत आहोत. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पुरस्कार आपण करू शकत नाही, असे फुलका यांनी स्पष्ट केले आहे.
मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मतपेट्या संसद भवनात आणल्या जातील. तेथे त्या कडेकोट बंदोबस्तात ठेवल्या जातील, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 20 जुलै रोजी मतमोजणी होणार असून त्यावेळी दोन्ही उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी आणि निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांसमोर या मतपेट्या उघडण्यात येतील. त्यानंतर मतमोजणी सुरू होईल. विजेत्या उमेदवाराला मुख्य निवडणूक अधिकार्‍याच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येईल. या सर्व प्रक्रियेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान झाल्यानंतर तेथील मतपेट्या विमानांमधून दिल्लीत आणण्यात येतील. विमानतळावरून त्या कडेकोट बंदोबस्तात थेट संसद भवनात आणण्यात येतील, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: