Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जुजारवाडी व वाठार परिसरात बिबट्या मादीसह बछड्याचे दर्शन
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re3
5काले, दि. 16 : जुजारवाडी व वाठार परिसरातील शिवारात काही दिवसांपासून शेतकर्‍यांना बिबट्याची मादी व बछड्याचे दर्शन झाल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. दररोज उसाच्या क्षेत्रात हे दोन बिबटे फिरताना दिसत आहेत. रविवारी दुपारपासून जुजारवाडी-वाठार रस्त्यावरील मानेवस्तीवरील सर्जेराव कांदेकर यांच्या उसाच्या क्षेत्रात बिबट्या दिसून आल्याने रात्री उशिरापर्यंत या उसाच्या शेतालगत शेकडो शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.  
काले, वाठार, जुजारवाडी, भैरवनाथनगर येथे गेल्या दोन महिन्यात बिबट्याची एक मादी व तिच्या दोन पिल्लांचे दर्शन शेतकर्‍यांना झाले होते. या परिसरात दररोज शेतकर्‍यांना शेतात जाताना रस्त्यावर, भैरवनाथनगर गावच्या मंदिराच्या शेजारी बिबटे दिसत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून जुजारवाडी व वाठारच्या शेत शिवारात मादी व बछडे दिसत आहेत.
रविवारी सकाळी जनावरांसाठी उसात वैरण काढण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना जुजारवाडी व वाठारच्या माने, साळवे व भरत पाटील यांच्या वस्तीनजीक उसाच्या शेतात दोन बछडे बसल्याचे निर्दशनास आले. त्यांनी मोठ्याने आरडा ओरड केला तेव्हा  हे बछडे तिथून पळून गेले. त्यानंतर मानेवस्तीवरील सर्जेराव कांदेकर (रा. वाठार) यांच्या उसाच्या शेतात दिवसभर बिबट्या दिसत होता. या उसाच्या शेतातच बिबट्याने तळ ठोकल्याने या शेताशेजारी दिवसभर शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तानाजी माने यांच्या जनावरांच्या शेडमधील रेडकू बिबट्याने फस्त केले होते. दररोज सकाळी येथील शेतकरी जनावरांच्या चार्‍यासाठी उसाची पाचट काढतात.  परंतु बिबट्याच्या भीतीने शेतात एकट्याला जाणेही धोक्याचे बनले आहे. काले, संजयनगर, वाठार, कालवडे, जुजारवाडी परिसरात बिबट्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: