Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सात महिन्यांत 102 दहशतवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Saturday, July 15, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: mn1
आता ‘हिटलिस्ट’वरील दहशतवाद्यांना टिपणार
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : या वर्षात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 102 दहशतवाद्यांचा खात्मा केला असून गेल्या सात वर्षांत सर्वाधिक दहशतवादी या कालावधीत मारले गेले आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांची ‘हिटलिस्ट’ सुरक्षा दलांनी तयार केली असून आता या यादीतील दहशतवाद्यांना टिपण्याची जय्यत तयारी सुरक्षा दलांनी केली आहे. या यादीत ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’ व ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या खतरनाक दहशतवाद्यांचा समावेश आहे.
सुरक्षा दलांनी यंदाच्या वर्षात काश्मीर खोर्‍यात मोठे यश मिळवले आहे. जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल 102 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा दक्षिण काश्मीरमधील कमांडर बशील लष्करी,  ‘हिजबुल’चा दहशतवादी सबजार अहमद भट अशा नामचीन दहशतवाद्यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या श्रेणीनुसार‘हिटलिस्ट’ तयार केली असून या यादीतील दहशतवाद्यांना टिपण्यासाठी मोहिमा आखण्यात येत आहेत, असे या अधिकार्‍याने सांगितले. जानेवारी ते जुलै या कालावधीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या गेल्या सात वर्षांतील सर्वात मोठी आहे, असे या अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
या आधी जानेवारी ते जुलै या कालावधीत सर्वाधिक 156 दहशतवादी 2010 मध्ये मारले गेले होते. याच कालावधीत 2016 मध्ये 77, 2015 व 2014 मध्ये प्रत्येकी 51, 2013 मध्ये 43, 2012 मध्ये 37 व 2011 मध्ये 61 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. आता दहशतवाद्यांना टिपण्यासाठी खास व्यूहरचना आखली जात आहे.  
सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर वर्चस्व मिळवले असून दहशतवाद्यांना पुरेशी मोकळीक मिळू दिली जात नाही. लष्कर, केंद्रीय सुरक्षा दले, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यातील समन्वयामुळे अधिकाधिक दहशतवादी ठार करण्यात यश मिळत आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व पाकिस्तानी दहशतवादी अबू इस्माईल याच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी तीव्र मोहीम उघडली आहे. ‘तोयबा’चा कमांडर बशीर लष्करी याच्यासह आझाद मलिक या दहशतवाद्याला 1 जुलै रोजी कंठस्नान घालण्यात आले. 12 जुलै रोजी बडगाम जिल्ह्यात ‘हिजबुल’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामध्ये सज्जाद गिलकर या स्थानिक दहशतवाद्याचा समावेश होता. यातील बहुतेक चकमकी दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ, पुलवामा, उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा व मध्य काश्मीरमधील बडगाम या भागात घडल्या आहेत.
सुरक्षा दलांनी आणखी दहशतवाद्यांची ‘हिटलिस्ट’ तयार केली आहे. त्यामध्ये ‘तोयबा’चे अबू दुजाना उर्फ हाफीज, जुनैद अहमद मट्टू उर्फ कांडरू, बशीर वणी उर्फ लष्कर, पुलवामा जिल्ह्यातील कमांडर शौकत टाक उर्फ हुजैफा, शोपियाँमधील कमांडर वसीम अहमद उर्फ ओसामा, झीनत-उल-इस्लाम उर्फ अलकामा, ‘जैश’चा अबू हमजा, ‘हिजबुल’चे दहशतवादी झाकीर रशीद भट उर्फ मुसा, सद्दाम पद्दार उर्फ झैद, रेयाज अहमद नायकू उर्फ झुबेर, मोहम्मद यासीन इट्टू उर्फ मान्सून, अल्ताफ अहमद दार उर्फ कचरू हे दहशतवादी सुरक्षा दलांच्या निशाण्यावर आहेत, असे या अधिकार्‍याने सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: