Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटके
ऐक्य समूह
Saturday, July 15, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: na1
योगी आदित्यनाथांची ‘एनआयए’ चौकशीची मागणी
5लखनौ, दि. 14 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश विधानसभेचे पाव साळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी (दि. 12) विधानसभेत ‘पीईटीएन’ या स्फोटक पदार्थाचे पाकीट सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विधानसभेच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. हा दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचा आरोप करताना यामध्ये कोणाचा हात आहे, याचा पर्दाफाश झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेश विधानसभेत बुधवारी समाजवादी पक्षाचे आमदार मनू यादव यांच्या आसनाखाली पांढर्‍या रंगाच्या स्फोटक पदार्थाची पावडर असलेले 150 ग्रॅम वजनाचे एक पाकीट सापडले. विधानसभेत सुरक्षारक्षक नियमित तपासणी करत असताना हे पाकीट सापडल्याने खळबळ उडाली होती. यादव यांचे आसन विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामगोविंद चौधरी यांच्या आसनाजवळ आहे. विधानसभेचे सुरक्षा कवच भेदून हा स्फोटक पदार्थ विधानसभेच्या आतमध्ये कसा आला, असा सवाल उपस्थित होत आहे. या पावडरची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली असता ‘पीईटीएन’ (पेंटाइरिथ्रोटल टेट्रानायट्रेट) या प्लास्टिक स्फोटकाची ही पावडर असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही पावडर नेहमीच्या स्फोटकशोधक यंत्रात सापडत नाही. या स्फोटक पदार्थात धातू नसतो. या स्फोटकाचा स्फोट घडवून आणण्यासाठी आणखी एका स्फोटकाची गरज भासते. मात्र, ‘पीईटीएन’ची स्फोटक क्षमता तीव्र असते. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्टीकरण दिले.   
विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आसनाखाली बुधवारी स्फोटक पदार्थ सापडले होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात या स्फोटक पदार्थाचे नाव ‘पीईटीएन’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. 150 ग्रॅम पीईटीएन सापडले असून संपूर्ण विधानसभा स्फोटाने उडवण्यासाठी 500 ग्रॅम पीईटीएनची गरज असते. 403 सदस्यसंख्या असलेल्या देशातील सर्वात मोठ्या विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडणे हा गंभीर प्रकार आहे. या सर्व प्रकरणाची ‘एनआयए’मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेमुळे विधानसभेच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या असून विधानसभेत नेमलेल्या प्रत्येक सुरक्षा कर्मचार्‍याची पोलीस पडताळणी झाली पाहिजे. सुरक्षेसाठी नव्याने नियमावली तयार करण्याची गरज असून सुरक्षा तपासणीदरम्यान प्रत्येक आमदाराने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडण्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. विधानसभेच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर स्कॅनर लावले जातील, असे त्यांनी सांगितले. हे पाकीट सापडल्यानंतर पोलिसांचे श्‍वानपथकाने बुधवारी विधानसभेत आणण्यात आले होते. या पथकातील श्‍वानांनाही पीईटीएन या स्फोटक पदार्थाचा शोध घेता आला नाही. या मागे दहशतवादी कट असावा, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
दोन दिवसांनी घटना समोर आली
विधानसभेत बुधवारी दुपारीच स्फोटक पदार्थ सापडले होते. मात्र, सचिवालयाच्या कामकाजाची वेळ संपेपर्यंत हा प्रकार उघड करण्यात आला नाही. कर्मचारी घरी परतल्यावर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना विधानसभेत पाचारण करण्यात आले. त्यानंतर ही पावडर तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: