Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंढे येथे गोडाऊन फोडून 30 लाखांची चोरी
ऐक्य समूह
Saturday, July 15, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि.14: मुंढे, ता. कराड येथे कराड-पाटण मार्गानजीक असलेल्या सतनाम एजन्सीचे गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह तंबाखू व सिगारेटचे सुमारे तीस लाखांचे बॉक्स लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. याबाबत एजन्सीचे मालक अनिल गोपीचंद बसंतानी, रा. कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की येथील अनिल गोपीचंद बसंतानी यांच्याकडे सिगारेट, तंबाखू व बिस्किटाच्या काही कंपन्यांची होलसेल विक्रीची एजन्सी आहे. त्यांच्या सतनाम एजन्सीचे गोडाऊन मुंढे, ता. कराड येथे आहे. या एजन्सीद्वारे कराड व  पाटण तालुक्यातील विक्रेत्यांना गोळ्या, बिस्कीट, तंबाखू, सिगारेटसह इतर साहित्य वितरित केले जाते. या एजन्सीमध्ये एकूण 26 कामगार व सुपरवायझर काम करतात. गुरुवारी रात्री 10 वाजता मालक अनिल गोपीचंद बसंतानी हे घरी गेले.   
त्यानंतर काही कामगार मालाचा हिशेब करत थांबले होते. रात्री 11 वाजता कामगारांसह मॅनेजर निखिल पोपटानी हे एजन्सी बंद करून गेले. शुक्रवारी सकाळी सहा वाजता एजन्सीच्या शेजारच्या रहिवाशांना एजन्सीचे शटर उचकटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी हा प्रकार तत्काळ अनिल बसंतानी यांना फोनवरून कळवला. बसंतानी काही कामगारांसह मुंढे येथे आले असता त्यांना एजन्सीत चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यास दिली. या माहितीनंतर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हणुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण घटनास्थळी आले. त्यांनी दुकानाची पाहणी केली असता चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी ड्रॉव्हर उचकटून तेथील पिशव्या अस्ताव्यस्त केल्या. ड्रॉव्हरमधील 4 लाख 66 हजारांची रोकड गायब केल्यानंतर चोरटे एजन्सीच्या पाठीमागील गोडाऊनकडे गेले. गोडाऊनचा दरवाजा तोडून त्यांनी आतील तंबाखूची पोती व सिगारेटचे बॉक्स पळवले. तब्बल 24 लाखांची तंबाखूची पोती व सिगारेटचे बॉक्स चोरट्यांनी गायब केले. ड्रॉव्हरसह तेथील कपाट तोडताना चिल्लर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या खाली पडल्या. त्या तशाच ठेवून चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला. मध्यरात्री चोरटे टेम्पोसारखे वाहन घेऊन आले असावेत आणि त्यांनी चोरी करून पळ काढला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: