Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रामनाथ कोविंद आज मुंबई दौर्‍यावर
ऐक्य समूह
Saturday, July 15, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: mn2
रालोआच्या आमदारांशी संवाद साधणार
5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे उद्या, दि. 15 रोजी मुंबई दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते भाजप शिवसेनेच्या आमदारांसह रालोआतील इतर घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काही अपक्ष आमदारांशी संवाद साधणार आहेत. रालोआची भूमिका आणि देशासमोरील समस्यांबाबतही ते चर्चा करणार आहेत.
रामनाथ कोविंद यांना सर्व मित्रपक्षांच्या आमदारांशी चर्चा करता यावी यासाठी गरवारे क्लबमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविंद यांचे सकाळी पावणेदहाच्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते गरवारे क्लब येथे आमदारांशी संवाद साधणार आहेत. आमदारांशी संवाद साधल्यानंतर मित्रपक्षांच्या निवडक नेत्यांसोबत दुपारचे भोजन करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या विमानाने गोवा येथील आमदारांच्या भेटीसाठी रवाना होतील.
विरोधकांची मते फोडण्याचे डावपेच
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून अधिकाधिक मते मिळावीत, सत्ताधारी बाजूच्या कोणी गडबड केली तर ते चव्हाट्यावर येऊ नये यासाठी विरोधकांची काही मते मिळवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. 
सरकारला उघड पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपल्या संपर्कात काँग्रेस-राष्ट्रवादीचे डझनभर आमदार
असल्याचे जाहीर केले आहे. सहा अपक्ष आमदारही कोविंद यांना मतदान करणार असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. महाराष्ट्रात भाजपकडे 122 तर शिवसेनेची 63 आमदारांची मते आहेत. सहा अपक्षांनी कोविंद यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील एका आमदाराच्या
मताचे मूल्य 175 आहे. भाजपच्या 122 आमदारांच्या मतांचे मूल्य 21 हजार 350 तर शिवसेनेच्या 63 आमदारांच्या मतांचे मूल्य 11 हजार 250 आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीसह इतर विरोधी पक्षांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41, सीपीआय (एम), समाजवादीचा प्रत्येकी एक, शेकापचे तीन आणि एमआयएमच्या दोन आमदारांचे समर्थन मीराकुमार यांना आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या मतांचे मूल्य 15 हजार 750 आहे. काँग्रेसचे नेते ‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता नाकारत आहेत तर सत्ताधारी पक्षाला अशा प्रकारे मते फुटणार असल्याचा विश्‍वास आहे. सत्तेचा दुरुपयोग करणे हीच भाजपची विचारधारा आहे. त्यामुळे मते फुटतील, अशा त्यांच्या वल्गनांचे आश्‍चर्य वाटत नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत
यांनी म्हटले आहे. विरोधकांचे एकही मत फुटणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
मतदान केंद्रात पेन, मोबाईलला मनाई
राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी होणार्‍या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. मतदान करण्यासाठी येणार्‍या आमदारांना आपल्याबरोबर मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या वेळी लागणारे पेन निवडणूक आयोग उपलब्ध करून देईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने खास पेन तयार करून घेतले आहे. या पेन व्यतिरिक्त दुसर्‍या कुठल्याही पेनचा मतदनासाठी वापर केल्यास ते मत बाद ठरेल. गेल्या वर्षी
हरियाणात राज्यसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या पेनऐवजी दुसरे पेन वापरल्याने काँग्रेसची 14 मते बाद ठरली होती. त्यामुळे यावेळी आमदार मोबाईल व पेन घेऊन जाऊ शकणार नाहीत,
मतदान केल्यानंतर आमदारांना हे पेन निवडणूक आयोगाला परत
करावे लागेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: