Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारताच्या अण्वस्त्र निर्मितीच्या केंद्रस्थानी चीन
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:44 AM (IST)
Tags: mn2
5वॉशिंग्टन, दि. 13(वृत्तसंस्था) : चीनला केंद्र-स्थानी ठेवून भारत आपल्या अण्वस्त्रांमध्ये सुधारणा करत असून पारंपरिकदृष्ट्या पाकिस्तानला केंद्रस्थानी ठेवून आखण्यात येणार्‍या भारताच्या अण्वस्त्र धोरणात बदल झाला आहे. दक्षिण भारतातील आपल्या तळांवरून संपूर्ण चीनला लक्ष्य करता येईल अशा दृष्टीने भारताकडून अत्याधुनिक अण्वस्त्रांची निर्मिती सुरू आहे, असा दावा अमेरिकेच्या ज्येष्ठ अण्वस्त्र विशेषज्ञांनी केला आहे. ‘आफ्टर मिडनाइट’ या डिजिटल नियतकालिकाच्या जुलै-ऑगस्टच्या आवृत्तीत याबाबतचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
भारताकडे सध्या 150 ते 200 अण्वस्त्रांची निर्मिती करता येईल इतका समृद्ध प्लुटोनियमचा साठा आहे. मात्र, तूर्त भारत केवळ 120 ते 130 अण्वस्त्रांची निर्मिती करेल, असे हान्स एम. क्रिस्टन्सन व रॉबर्ट एस. नोरिस या अमेरिकी तज्ज्ञांनी ‘इंडियन न्युक्लिअर फोर्सेस 2017’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. भारत व चीन यांच्यात सध्या सिक्कीम क्षेत्रातील डोकलाम भागात संघर्ष सुरू आहे. चिनी सैन्याकडून या भागात सुरू असलेल्या रस्तेबांधणीला भारतीय सैन्याने आक्षेप घेतल्याने दोन्ही देशांचे सैन्य गेले काही आठवडे एकमेकांसमोर उभे आहे. या मुद्द्यावरून चीनकडून भारताला सतत युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारताने चीनवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी भारताच्या पारंपरिक अण्वस्त्र धोरणाच्या केंद्रस्थानी कट्टर शत्रू पाकिस्तान होता. मात्र, आता भारताने आपले लक्ष चीनकडे वळवले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भारताकडून संपूर्ण चीनला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक अण्वस्त्रांची निर्मिती करण्यात येत असल्याचा दावा या तज्ज्ञांनी केला आहे.  
दक्षिण भारतातील आपल्या तळांवरून संपूर्ण चीनला लक्ष्य करता येईल, अशा अत्याधुनिक अण्वस्त्रांची निर्मिती भारताकडून करण्यात येत आहे. भारताकडे दीडशे ते दोनशे अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी समृद्ध प्लुटोनियमचा साठा आहे. मात्र, भारताने आतापर्यंत केवळ 120 ते 130 अण्वस्त्रांचीच निर्मिती केल्याची शक्यता या लेखात वर्तवण्यात आली आहे. भारताला पारंपरिक शत्रू पाकिस्तानपेक्षा चीनकडून अधिक धोका असल्याचे अलीकडच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चीनवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताने आपली रणनीती आखली आहे.
आतापर्यंत पारंपरिक शत्रू पाकिस्तानकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन भारताचे अण्वस्त्र विकासाचे धोरण आखले जात होते. मात्र, आता भारताकडून निर्मिती करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक अण्वस्त्रांकडे पाहता भारताचे लक्ष आता चीनकडे अधिक आहे, याचे संकेत मिळत आहेत. भारताकडे सात प्रकारच्या सक्षम क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. त्यामध्ये हवेतून मारा करणार्‍या दोन, जमिनीवरून मारा करणार्‍या चार (बॅलेस्टिक मिसाइल) आणि समुद्रातून मारा करणार्‍या एका सक्षम क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश आहे. भारत किमान आणखी
चार सक्षम अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र प्रणालींवर काम करत असून पुढील दशकभरात त्या तैनात करण्याची शक्यता आहे, असा दावाही या तज्ज्ञांनी केला आहे. भारताने विकसित केलेल्या ‘अग्नी-4’ या क्षेपणास्त्राचा पल्ला मोठा आहे. या क्षेपणास्त्राद्वारे ईशान्य भारतातील तळांवरून
बीजिंग व शांघाय या शहरांसह संपूर्ण चीनला लक्ष्य करता येऊ शकते. आता भारताकडून ‘अग्नी-5’ ही आणखी मोठ्या पल्ल्याची
क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजार किलोमीटरहून अधिक असेल. हे क्षेपणास्त्र विकसित केल्यानंतर भारतीय लष्कराला चीनपासून दूर मध्य आणि दक्षिण भारतातही क्षेपणास्त्र तळ स्थापन करता येतील, असेही या लेखात
म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: