Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकिस्तानशी चर्चा द्विपक्षीय चौकटीतच
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:39 AM (IST)
Tags: na1
चीनचा मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने धुडकावला
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्‍नात रचनात्मक मध्यस्थाची भूमिका निभावण्याचा चीनचा प्रस्ताव भारताने सपशेल धुडकावून लावला आहे. पाकिस्तानबरोबर सर्व मुद्द्यांवर द्विपक्षीय चौकटीतच चर्चा करण्याची आमची भूमिका बदललेली नाही. आमच्या बाजूने चर्चेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, सीमेपलीकडून भारतावर थोपवला जाणारा दहशतवाद हाच कळीचा मुद्दा आहे, असे भारताकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
सिक्कीमजवळ डोकलाम येथे भूतानची बाजू घेत भारताचे सैन्य चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या विरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळे संतापलेल्या चीनकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. त्यातच पाकिस्तानने विनंती केल्यास आम्ही काश्मीरमध्येही सैन्य घुसवू शकतो, असे चीनने भारताला धमकावले होते. डोकलाम वादावरून भारताला अडचणीत आणण्यासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. 
या प्रश्‍नात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रचनात्मक मध्यस्थाची भूमिका बजावण्यास चीन उत्सुक आहे, असे वक्तव्य चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी बुधवारी केले होते.
मात्र, भारताने चीनचा हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला आहे. पाकिस्तानबरोबरच्या वादात आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. दोन्ही देशांमधील वाद द्विपक्षीय चौकटीतच सोडवले जावेत, या आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही. या सगळ्या वादाचे मूळ कारण सीमेपलीकडून दहशतवादाला दिले जाणारे प्रोत्साहन हेच आहे. त्यामुळे या प्रदेशातील शांतता व स्थैर्याला धोका आहे. या मुद्द्यावर आम्ही द्विपक्षीय चौकटीतच पाकशी चर्चा करायला तयार आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: