Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडोलीच्या उपसरपंचासह दोघांवर तलवारीने वार
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:43 AM (IST)
Tags: re3
वाळू ठेक्याच्या पैशाच्या देवघेवीवरून वाद
5उंब्रज, दि. 13 ः उंब्रजनजीक वडोली भिकेश्‍वर येथे वाळूच्या ठेक्याच्या पैशावरून झालेल्या वादातून तलवारीने वार झाल्याने वडोलीचे उपसरपंच नामदेव शंकर साळुंखे व अजित साळुंखे हे जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 12) रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मसूर-उंब्रज मार्गावर वडोली भिकेश्‍वर गावच्या हद्दीतील हॉटेल दावतमध्ये संशयित अमीर शेख व त्याचा एक साथीदार (दोघांचे पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही.) यांनी वाळूच्या ठेक्यात घेतलेले पैसे परत देऊनही नामदेव साळुंखे यांच्याकडे आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. या कारणावरून चिडून जाऊन दोघांनी नामदेव साळुंखे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यावेळी नामदेव साळुंखे यांना सोडवण्यासाठी गेलेल्या अजित साळुंखे (रा. वडोली) यांच्यावरही तलवारीचा वार झाला. यामध्ये नामदेव साळुंखे यांच्या हातावर व कानावर आणि अजित यांच्या डोक्यावर तलवारीचे वार झाल्याने त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाळू व्यावसायिक नामदेव साळुंखे हे वडोली भिकेश्‍वरचे उपसरपंच असून वाळूतील पैशाच्या देवघेवीतून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गतवर्षी वडोली भिकेश्‍वर येथील वाळू ठेक्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. या व्यवहारातूनच ही घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 
या प्रकरणी नामदेव साळुंखे  यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक करण्यात आली नव्हती. हवालदार भगवान माने तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: