Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ सातार्‍यात कँडल मार्च
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: lo1
एक वर्षानंतरही न्यायाची प्रतीक्षा : जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध
5सातारा, दि. 13 : कोपर्डी येथील मराठा समाजातील युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ कोपर्डी येथील भगिनीला श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी सातार्‍यातून कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये सर्व राजकीय पक्ष, संघटना, सर्व समाजघटक सहभागी झाले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चे काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृण खून केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्याला हदरुन सोडले. या घटनेनंतर मराठा समाजाने राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले. त्यानंतर सरकारने या घटनेचा तपास करुन जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यातील आरोपींना लवकरच शिक्षा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, या घटनेला एक वर्ष उलटून गेले तरीही खटल्याचा निकाल लागला नाही. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी कॅटल मार्चचे आयोजन करण्यात होते. सायंकाळी 6 वाजता भूविकास बँक परिसरातील हुतात्मा स्मारकातील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मार्चला सुरुवात झाली. यावेळी सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्चचे नेतृत्व युवतींनी केले. त्यांच्या पाठी महिला होत्या. त्यांच्या मागे पुरुष हातात मेणबत्त्या घेवून सहभागी झाले होते. मार्च जसजसा पोवई नाक्याच्या दिशेेने सरकत होता. तसतसा मार्चमध्ये सहभागी होणार्‍या लोकांची संख्या वाढत होती. मार्च तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आल्यानंतर नागरिकांची चांगलीच संख्या वाढली. पोवई नाका परिसरात मार्च आल्यानंतर युवतींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर भगिनीला श्रध्दांजली म्हणून तिला पुष्पचक्र अर्पण करुन क्रांती मशाल पेटवण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दोन मिनिटे शांत उभे राहून तिला श्रध्दांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादी महिला आघाडीचा मूक मोर्चा
 कोपर्डी बलात्कार व हत्येच्या घटनेला 1 वर्ष होवून या प्रकरणाचा  निकाल प्रलंबित असून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराची संख्या वाढ असल्याच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तोंडावर काळी पट्टी बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून आरोपींना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अमानुष पध्दतीने हत्येच्या प्रकरणाला येत्या 13 जुलै रोजी 1 वर्ष पूर्ण होईल. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुरु असताना अद्याप निकाल लागलेला नाही. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारण्यासारखा प्रकार असतो. त्यामुळे राज्यात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. अपहरण करुन बलात्काराच्या तीन घटना मुंबईत एका आठवड्यात घडल्या. चालत्या गाडीत महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. शारीरिक शोषण व बलात्काराच्या घटना सरकारला धक्कादायक वाटत नाहीत. सरकार इतके स्त्रियांच्या बाबतीत असंवेदनशील झाले आहे.
उच्च न्यायालयानेही महिला सुरेक्षाच्या प्रश्‍नावरुन राज्य सरकारला फटकारले आहे. रामराज्य फक्त कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र महिला सुरक्षेबाबत सरकार उदासीन असल्याचे परखड मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. केवळ उपाययोजना नको, ठोस पावले उचलावीत, असे न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. हे सर्व ताशेरे ओढले जात असताना गृह खाते स्वतःकडे असताना मुख्यमंत्री मात्र मूग गिळून बसले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे कायदा सुव्यवस्थेबाबत सपशेल अपयशी ठरले आहेत. तरी गृहखात्याला स्वतंत्र मंत्री देण्याबाबत ते नकारात्मक आहेत.
अत्याचार करुन महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवण्यार्‍या गुन्हेगाराला वचक बसला पाहिजे. शिक्षा देण्याची प्रक्रिया इतकी लांबतच राहिली तर नराधमावर कसा जरब बसणार, स्त्री सक्षमीकरणाला
डंका वाजवणारे हे सरकार प्रत्यक्षात काहीच करीत नाही. स्त्रियांना
मानाने जगण्याचा अधिकार न देणार्‍या सरकारचा आम्ही निषेध करतो. कोपर्डी बलात्कार आणि हत्या तसेच महिला अत्याचारातील
आतापर्यंतच्या सर्व प्रकरणातील आरोपींवर लवकरच खटले दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी करण्यात आली. निवेदन
देताना शहराध्यक्षा सुजाता घोरपडे, सातारा तालुकाध्यक्ष कविता मेणकर, जिल्हा उपाध्यक्ष नंदिनी जगताप, अलका मोरे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: