Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकभावना लक्षात घेवून हेल्मेट सक्ती ‘तूर्त’ लांबणीवर
ऐक्य समूह
Friday, July 14, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: mn1
टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी; पोलिसांपासून सुरुवात
5सातारा, दि. 14 : प्रत्येकाला हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय लोकभावना लक्षात घेवून तूर्त पोलिसांनी स्थगित केला आहे. एकदम मोठी सर्जरी करून लोकांच्या उद्रेकाला खतपाणीघालण्याऐवजी नियोजनबद्ध पद्धतीने हा निर्णय अंमलात आणण्याचे नियोजन  पोलीस खात्याने केले आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्यांना हेल्मेट सक्तीतून सूट मिळाली आहे.  आगामी काळात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. पहिल्यांदा सर्व पोलीस कर्मचार्‍यांवर हेल्मेट सक्तीचा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना आणि त्यानंतर निमशासकीय कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक अशी हेेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कोल्हापूर विभागातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली.  हेल्मेट सक्तीला लोकांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे एकाच दिवसात सर्वत्र हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे ठरवण्यात आले आहे. या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशी भूमिका सर्वच अधिकार्‍यांनी मांडली. त्यास नांगरे-पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.  हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचा निर्णय कसा अंमलात आणायचा याचेही धोरण ठरवण्यात आले आहे. पहिल्यांदा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यमार्गावरही हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ सातारा-कोरेगाव रस्त्यावरही हेल्मेट घालूनच वाहनचालकांना वाहने चालवावी लागणार आहेत. दरम्यानच्या काळात  शासकीय आणि निमशासकीय कर्मचार्‍यांना मात्र तातडीने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले जाणार आहे.  
पहिल्यांदा सर्व पोलीस दलाला हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यानंतर महाविद्यालयांचे प्राध्यापक, शाळेतील शिक्षक अशा निमशासकीय कर्मचार्‍यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर खाजगी आस्थापना, कंपन्या यामध्ये काम करणार्‍यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.  त्यानंतर  सर्वसामान्य नागरिकांनाही हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस दलानेएकाच रात्रीत हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय अंमलात आणण्याचा विचार तात्पुरता सोडून दिला आहे. हा निर्णय कायमस्वरूपी अंमलातच आणायचा नाही, असे ठरलेले नाही. मात्र, त्याची अंमलबजावणी  टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
शहरात रात्रीच्या वेळी 11 नंतर सुसाट वेगाने वाहने चालवणार्‍यांना हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. त्यांनी हेल्मेट वापरले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ट्रिपल सीट, कागदपत्रे न बाळगणारे, नंबर प्लेटवर नंबर न लावणारे, फॅन्सी नंबर प्लेट
वापरणारे, परवाना नसताना वाहन चालवणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: