Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकच्या गोळीबारात दोन जवान शहीद
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
बडगाममध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
5श्रीनगर, दि.12(वृत्तसंस्था) : अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी मोहीम तीव्र करून बडगाम येथे तीन दहशतवाद्यांना बुधवारी पहाटे कंठस्नान घातले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्टर येथे बुधवारी नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले.
अमरनाथ यात्रेवरून परत येणार्‍या यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर 32 यात्रेकरू जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी मोहीम तीव्र केली असून संपूर्ण काश्मीर खोर्‍यात अत्युच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान, जम्मू-काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी मंगळवारी रात्री बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना घेरले होते. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांच्या जवानांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुरू झालेली चकमक बुधवारी पहाटे संपुष्टात आली. या चकमकीत ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या जावेद शेख, दाऊद आणि अकिब या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.   
त्यातील शेख हा ‘हिजबुल’चा कमांडर होता. 23 जून रोजी श्रीनगर येथे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांची जमावाने दगडांनी ठेचून हत्या केली होती. सुरक्षा दलांनी मंगळवारी ठार केलेल्या ‘हिजबुल’च्या दहशतवाद्यांपैकी एकाचा पंडित यांच्या हत्येत सहभाग होता, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. बडगाम येथील चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे.
दरम्यान, सुरक्षा दलांच्या या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्टर येथे नियंत्रण रेषेवर बुधवारी सकाळी गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले, अशी माहिती एका लष्करी अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आधी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाल्याची माहिती याच अधिकार्‍याने दिली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: