Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

नरपशूंचा हल्ला
vasudeo kulkarni
Thursday, July 13, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: ag1
अमरनाथच्या पवित्र गुहेतल्या श्री शंकराचे दर्शन घेऊन अनंतनागहून जम्मूकडे जाणार्‍या यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री नरपशू दहशतवाद्यांनी हल्ला चढवून 7 भाविकांचे केलेले हत्याकांड, म्हणजे माणूसकीचाही मुडदा पाडणारे भयानक कृत्य होय. गेली काही वर्षे अमरनाथच्या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे भीषण सावट असले, तरीही लष्कर, सीमा सुरक्षादल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे ही यात्रा शांततेत पार पडत होती. 1 ऑगस्ट 2000 या काळ्या दिवशी पेहलगामच्या अमरनाथ श्राईन बोर्डाच्या यात्रेकरूंच्या मुख्य तळावर दहशतवाद्यांनी अचानक चढवलेल्या हल्ल्यात 45 भाविकांचे मृत्यू झाले होते. त्या घटनेची जगभर निंदाही झाली होती. पण या घटनेनंतर मात्र अमरनाथ यात्रेवर भ्याड हल्ला चढवायचे धाडस सैतानी आणि विकृतीने पछाडलेल्या दहशतवाद्यांना झाले नव्हते. पण, सोमवारी रात्री मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्थेतल्या चुकीमुळे भाविकांच्या बसवर हल्ला चढवायची संधी मिळाली. अमरनाथाचे दर्शन घेऊन वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन पुढे जम्मूला जायसाठी 56 यात्रेकरूंना घेऊन ही बस अनंतनागहून निघाली, ती सुरक्षा व्यवस्थेचा भंग करून. रात्री सात नंतर अनंतनाग- जम्मू महामार्गावरून वाहने चालवू नयेत, असा नियम अंमलात असतानाही, ही खाजगी बस रात्रीच्या वाहतूकबंदीचा नियम मोडून या महामार्गावरून जात होती. या मार्गावर येणा-जाणार्‍या सर्व वाहनांना पोलीस आणि सुरक्षा दलांचे संरक्षण असल्याने, आतापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित होती. पण, या एकाकी जाणार्‍या बसला हेरून दहशतवाद्यांनी बाटेंगूच्या परिसरात तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना घडली, तेव्हा या रस्त्यावर सुरक्षा रक्षकांची गस्त नव्हती. दहशतवाद्यांनी अचानक चढवलेल्या हल्ल्यामुळे या गाडीचा चालक सलीम शेख गफूर याला मृत्यूच्या संकटाची जाणीव झाली. त्याने धैर्याने न डगमगता बस न थांबवता भरधाव वेगाने 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या लष्करी तळावर आणली. पण, दोन वेळा दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बसच्या खिडक्यांजवळ बसलेले 7 यात्रेकरू ठार झाले आणि 19 जण जखमी झाले. आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसानेच 50 यात्रेकरूंचे प्राण वाचले अन्यथा अधिक प्राणहानी झाली असती. केंद्र आणि गुजरात सरकारने त्याला बक्षीस जाहीर करून त्याच्या धैर्याची प्रशंसा केली. हे योग्यच झाले. दहशतवाद्यांनी हल्ला चढवलेल्या बसची आणि बसमधील यात्रेकरूंची नोंद यात्रा सुरक्षा समितीकडे नव्हती, हा पोलिसांचा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. नोंदणी झालेली ही बस त्या रात्री लष्करी जवानांनी आणि परिसरातल्या जनतेने तातडीने मृत्यूच्या कराल संकटातून वाचलेल्या यात्रेकरूंना मदत करून माणुसकी जागवली. दहशतवाद्यांनी मात्र धार्मिक सामंजस्य आणि एकजुटीच्या काश्मिरियतच्या परंपरेची मात्र आपल्या राक्षसी कृत्याने होळी केली. अमरनाथच्या यात्रेसाठी देशभरातून येणार्‍या लाखो भाविकांची अनंतनाग आणि परिसरातले मुस्लीम लोकही श्रद्धेने सेवा, सहाय्य करतात. यात्रेकरूंच्या मदतीसाठी याच भागातील लोकांची पथकेही सेवाकार्यात गर्क असतात. या हल्ल्याने अमरनाथच्या यात्रेवरचे दहशतवादाचे सावट अधिक गंभीर झाले असले, तरी केंद्र आणि राज्य सरकारने मात्र या हल्ल्याची निंदा करीत अधिक सुरक्षा व्यवस्थेत ही यात्रा सुरू ठेवत, दहशतवाद्यांच्या नीच कृत्यांना, कट कारस्थानांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाविकांच्या या सामूहिक हत्याकांडाचा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह फुटीरतावादी हुर्रियत परिषदेच्या नेत्यांनीही निषेध करून, हा मानवतेवर हल्ला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.     

पाकिस्तानचेच कारस्थान
काश्मीर खोर्‍यातल्या लाखो लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेला पर्यटन व्यवसाय बंद पाडून लोकांची रोजीरोटी हिरावून घ्यायसाठी पाकिस्ताननेच दहशतवाद्यांना आणि त्यांच्या साथीदारांना, हिंसाचार पेटता ठेवायसाठी हजारो कोटी रुपयांचा पुरवठा केला. परिणामी काश्मीर खोर्‍यात सुरक्षा दलाच्या जवानांवर सुरू झालेले दगडफेकीचे सत्र थांबलेले नाही. अशांत परिस्थितीमुळे काश्मीर खोर्‍यातला पर्यटन व्यवसाय जवळजवळ ठप्प झाला. आता अमरनाथच्या यात्रेमुळे अनंतनाग आणि परिसरातल्या लोकांना मिळणारा व्यवसाय बंद पाडायसाठी ही यात्रा उधळून लावायची कटकारस्थाने पाकिस्तानातच शिजल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्नही झाले आहे. या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबाचा म्होरक्या इस्माईल यानेच आखली होती आणि त्याचा सुगावा भारतीय गुप्तचर यंत्रणांना लागलेला होता. त्यामुळेच असा दहशतवादी हल्ला यात्रेकरूंवर होण्याचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. आतापर्यंत यावर्षी यात्रा सुरू झाल्यापासून 40 हजार जवानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 1 लाख 10 हजार यात्रेकरू अमरनाथचे दर्शन घेऊन सुरक्षितपणे परतलेही होते. पण, या हल्ल्यामुळे यात्रा बंद पडेल, हा दहशतवाद्यांचा अंदाज मात्र सुरक्षा दलांनी आणि सरकारने, निर्भय यात्रेकरूंच्या निर्धाराने उधळला गेला. या हल्ल्यानंतर गेल्या 2 दिवसात 8 हजार यात्रेकरूंचे जथे अमरनाथच्या गुहेकडे कडक सुरक्षा व्यवस्थेत वाटचाल करीत आहेत. नाक्यावरच ही बस अडवली गेली असती, तर भाविकांचे हकनाक बळी गेले नसते. सुरक्षा यंत्रणेतली ही छोटीशी पण भयंकर चूक निरपराध भाविकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. वास्तविक या बसवरच्या हल्ल्याच्या आधी काही वेळापूर्वीच बाटेंगूच्या पोलिसांच्या छावणीवर आणि त्यानंतर खानबलच्या पोलीस नाक्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. पण, पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने हे दहशतवादी पळून गेले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी अनंतनाग- जम्मू मार्गावरची सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली असती, या मार्गावर रात्रीची गस्त असती, तर हे दहशतवादी पोलिसांच्या तावडीत सापडले असते आणि ही दुर्घटनाही घडली नसती. या आधीही अमरनाथ यात्रा बंद पाडायसाठी पाकिस्तानच्या चिथावणीने, या यात्रेत अडथळे आणायचे प्रयत्न झाले होते. अमरनाथ श्राईन बोर्डाला यात्रेच्या काळात सरकारी मालकीची जमिन वापरायसाठी द्यायच्या विरोधात काश्मीर खोर्‍यातल्या फुटीरतावाद्यांनी उग्र आंदोलनही केले होते. तेव्हा जम्मूतल्या जनतेने श्रीनगर आणि काश्मीर खोर्‍याची नाकेबंदी केल्याने, फुटीरतावाद्यांना माघार घ्यावी लागली होती. गेली शेकडो वर्षे शांततेने पार पडणारी अमरनाथची यात्रा हे काश्मीर खोर्‍यातल्या धार्मिक ऐक्याचे प्रतीक असल्याने धर्मांध दहशतवाद्यांनी या ऐक्याला सुरुंग लावून, या यात्रेच्या मार्गातल्या जनतेची उपासमार करायचा रचलेला हा कट होता. केंद्र सरकारने आता अधिक सावधपणे पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या या विकृत कारवाया मोडून काढायला हव्यात.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: