Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हेल्मेट सक्तीवरुन सातारकरांचा असंतोष वाढला
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: lo3
पोवई नाक्यावर स्वाक्षर्‍यांची मोहीम; सोशल मीडियावरून निर्णयाची खिल्ली
5सातारा, दि. 12 : हेल्मेट सक्तीवरून नागरिकांच्या तीव्र असंतोषाला पोलिसांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. शहरात हेल्मेट सक्ती करू नये यासाठी दिवसेंदिवस विरोध वाढू लागला आहे. मात्र, पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. बुधवारी आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांची मोहीम घेवून  हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियावरूनही पोलिसांच्या निर्णयाची खिल्ली उडवण्यात येत असून त्यावर शेरेबाजी करण्यात येत आहे.
हेल्मेट सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात सर्वच स्तरातून विरोधाचा सूर उमटू लागला आहे. सर्वच राजकीय पक्ष हेल्मेट सक्तीच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. हेल्मेट सक्तीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपसह  सर्वच पक्षांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय मागेघ्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. एकूणच शहरातील ढासळती कायदा सुव्यवस्था, वाहतुकीचा खेळखंडोबा यावरूनच पोलिसांवर शेरेबाजी सुरू झाली आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारे लिखाण दिसत आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे कठीण आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आ. शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी पोवई नाक्यावर हेल्मेट सक्तीच्या विरोधातस्वाक्षर्‍यांची मोहीम उघडली. दुपारपर्यंत सातारा शहरातील दोन हजार नागरिकांनी त्यावर स्वाक्षर्‍या करून या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवल्याचे सांगण्यात आले. या स्वाक्षर्‍यांचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे.
सोशल मीडियावरून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनाही टार्गेट करण्यात आले आहे. सातार्‍यातील काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय का...’ या गाण्यातील भरवसा हा शब्द वगळून तिथे विश्‍वास हा शब्द टाकून हेल्मेट सक्ती नको, सुविधा द्या, अशी वाक्यरचना केली आहे. हे विडंबनही व्हॉट्स अ‍ॅपवर चांगलेच फिरले आहे.  
त्यामध्ये पालिकेतील पथदिव्यांच्या भ्रष्टाचाराचाही समाचार घेण्यात आला आहे.
‘सोनू? तुझा माझ्यावर विश्‍वास नाय का?’ या मथळ्याखाली हे विडंबन असून त्यामध्ये ‘सातारचे खड्डे कसे...गोलगोल..गोल...पथदिवे लावताना झालेत  झोल...झोल ...तरी पण हेल्मेट घालशील का  बोल... बोल...बाकीच्या सुविधांचा उठलाय बोजवारा तरी हेल्मेट सक्तीचा दिलाय नारा  गोल... गोल...’ असा मजकूर  आहे.
पोलीस, प्रशासनाचे कर्तव्य काय?
कपिल राऊत या नागरिकाने तर जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे, हेल्मेट सक्ती ही जनतेच्या हिताची आहे. त्याबरोबरच अपघात होण्याची आणि गाडीवरून माणूस पडण्याची अनेक कारणे आहेत आणि ती पण विचारात घ्यावीत. त्यामध्ये रस्त्यात खड्डा असल्याने पडणे, गर्दीच्या ठिकाणी चौकात धडकून पडणे, दारू पिवून गाडी चालवल्याने पडणे, रस्त्याचे काम चालू असताना गैरसोय होवून धडकणे, रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट नसल्याने धडकणे, जनावरे रस्त्यात आल्याने धडकणे अशा अनेक कारणांचा समावेश होतो. त्यामुळे ज्याप्रमाणे हेल्मेट न घालणार्‍याला 500 रुपये दंड केला जातो,  त्याप्रमाणे सरकारी सुविधा न पुरवण्यासाठीही प्रशासनातील अधिकार्‍यांना दंडाची तरतूद करावी, अशी अभिनव मागणी त्यांनी केली आहे.
 जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे न मुजवल्यास बांधकाम विभागातील सर्व कर्मचार्‍यांना 15 तारखेनंतर दिवसाला 100 रुपये दंड करावा, जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर स्ट्रीटलाईटची व्यवस्था करावी.  तसे न केल्यास विद्युत विभागातील सर्व कर्मचार्‍यांना दिवसाला 100 रुपये दंड करावा, रहदारीच्या सर्व चौकात सिग्नल यंत्रणा बसवावी.  तसे न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांना दिवसाला 100 रुपये दंड करावा. शहरात सर्व ठिकाणी सुरू असलेल्या चौपदरीकरणाची कामे 15 तारखेपर्यंत पूर्ण करावीत. पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदार कंपनीला दिवसाला 10 हजार रुपये दंड करावा. अजंठा चौकात गेले कित्येक दिवस उड्डाणपुलाचे काम सुरू आहे ते 15 तारखेपर्यंत न झाल्यास दिवसाला 1 लाख रुपये दंड करावा. 15 तारखेनंतर रस्त्यावर एकही जनावर दिसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांना दिवसाला 100 रुपये दंड करावा. रात्री दारू पिवून गाडी चालवणार्‍यांची संख्या जास्त असते. त्याचवेळी वाहतूक पोलीस ड्युटीवर नसतात.
त्यामुळे वाहतूक पोलिसांना रात्रीही ड्युटीवर ठेवावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्या करताना त्यांनी म्हटले आहे, की अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्याचा कायदेशीर अधिकार गाजवताना नागरिकांना
रस्त्यावर सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात याचेही कर्तव्य
प्रशासनाने पार पाडावे. एका नागरिकाने प्रशासनाला निवेदन देवून प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातील भावना मांडल्या आहेत. एकूणच सर्वच स्तरावर हेल्मेट सक्तीच्या विरोधात सूर असून पोलिसांनी या निर्णयाचा फेरविचार करावा आणि तेच योग्य ठरणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: