Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंड्या धाराशिवकरसह साथीदारांवर आणखी एक गुन्हा
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: lo1
17 लाखापोटी 48 लाखाची वसुली; वसुलीसाठी ऑफिस फोडून टाकला दरोडा
5सातारा, दि. 12 : व्याजाने घेतलेल्या 17 लाख रुपयांपोटी आतापर्यंत 48 लाख 80 हजार रुपये परत देवूनही रक्कम बाकी आहे, अशी मागणी करत ऋषिकेश आप्पा भोसले (रा. वनगळ, ता. सातारा) यांच्या राधिका रोडवरील ऑफिसची तोडफोड करून त्यांच्याकडील 24 हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. त्याशिवाय त्यांच्याकडून जबरदस्तीने 14 लाख रुपयांचे धनादेशही लिहून घेण्यात आले. या प्रकरणी प्रमोद उर्फ मामा घाडगे आणि खंड्या धाराशिवकरसह सहा जणांवर दरोड्याचा व खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात  प्रदीप उर्फ मामा घाडगे, अमीर बागवान, खंड्या धाराशिवकर, मालिक (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही.) आणि दोन अनोळखींचा संशयितांमधये समावेश आहे.
या घटनेतील फिर्यादी ऋषिकेश भोसले हे व्यवसायाने टॅक्स कन्सल्टंट आहेत. त्यांचा शेअर ट्रेडिंगचाही व्यवसाय आहे. राधिका रोड आणि लिंब येथे त्यांच्या व्यवसायाची कार्यालये आहेत. व्यवसायासाठी त्यांना पैशाची गरज होती.   
त्यामुळे 2014 मध्ये त्यांनी प्रदीप उर्फ मामा घाडगे याच्याकडून 5 लाख रुपये 20 टक्के व्याजाने घेतले. त्यावेळीच व्याजाचे 1 लाख रुपये काढून घेवून 4 लाखाचीच रक्कम घाडगेने भोसले यांना दिली. त्यावेळी त्यांनी सिक्युरिटी म्हणून टेम्पोची कागदपत्रे नोटरी करून घेतली होती. या रकमेपोटी त्यांनी 12 लाख रुपये व्याज दिले. त्यानंतर 2016 मध्ये पुन्हा 6 लाख रुपये त्यांनी घेतले.  त्यानंतर पुन्हा 7 लाख रुपये घेतले. घेतलेली सगळी रक्कम त्यांनी जागा विकून त्यांना परत केली. एकूण घेतलेल्या 17 लाख रुपयांपोटी 48 लाख 80 हजार रुपये माघारी दिले, तरीही ते पैसे बाकी आहेत, असे सांगून वारंवार शिवीगाळ व दमबाजी करायचे आणि भोसले यांच्याकडून कोरे धनादेश काढूनघ्यायचे. कोरे धनादेश त्यांनी बँकेतही भरले होते आणि ते न वटता परतही घेतले होते. दि. 11 जुलै रोजी सकाळी प्रमोद उर्फ मामा घाडगे व त्याचे साथीदार राधिका रोडवरील त्यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी तिथे त्यांना शिवीगाळ,मारहाण केली. त्यांच्या कार्यालयातील कॉम्प्युटरच्या साहित्याची तोडफोड केली. त्याचबरोबर 14 लाख रुपयांची रक्कम लिहून धनादेशही घेतला. त्यानंतर त्यांनी या घटनेची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.
व्याजाने पैसे दिल्याच्या प्रकरणात खंड्या धाराशिवकरवर आतापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अजूनही खंड्या धाराशिवकर पोलिसांना सापडत नाही. खंड्याला पकडण्यात सातारा शहर पोलीस अपयशी ठरले आहेत. खंड्याला पकडण्यासाठी पोलीस अपेक्षित प्रयत्न करत नाहीत हेच वास्तव त्यामधून सामोरे आले आहे. खंड्याने अनेकांना लुटले आहे. त्याच्या अन्यायाचे बळी ठरलेल्यांची संख्या मोठी आहे. त्याला पकडल्याशिवाय आणखी तक्रारी त्याच्या विरोधात दाखल होणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: