Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘आधार’मुळे गोपनीयतेच्या अधिकारावर गदा?
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: na2
पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ तपासणार वैधता
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : सरकारी लाभाच्या योजनांसाठी आधारकार्डची सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आणि आधारमुळे नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेले हे घटनापीठ आधारच्या वैधतेची शहानिशा करणार असून पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलै रोजी होणार आहे.
सरकारी लाभाच्या योजनांसाठी केंद्र सरकारने आधार क्रमांक सक्तीचा केला आहे. त्याचबरोबर प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी पॅन क्रमांकाला करणेही बंधनकारक केले आहे. केंद्राच्या या निर्णयाच्या वैधतेला आव्हान देणार्‍या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. आधारकार्ड मिळवण्यासाठी द्याव्या लागणार्‍या वैयक्तिक माहितीमुळे नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेपही याचिकाकर्त्यांनी घेतला आहे. केंद्र सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल आणि याचिकाकर्त्यांचे वकील श्याम दिवाण यांनी हे प्रकरण आज सरन्यायाधीश जगदीशसिंग खेहर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर उपस्थित केले.  
या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती दिवाण यांनी केली. त्यावर वेणुगोपाल यांनी सरकारच्यावतीने बाजू मांडली. या आधी आठ न्यायमूर्तींच्या पीठाने गोपनीयतेचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत हक्क नसल्याचा निर्णय दिल्याकडे वेणुगोपाल यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. त्यावर आधारमुळे गोपनीयतेच्या अधिकारावर गदा येते का, याची याचिकानिहाय तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवायचे की, पाच न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवायचे, असे खंडपीठाने विचारले असता दोन्ही वकिलांनी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवावे, असे सांगितले.
हे प्रकरण नऊ न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवणे आवश्यक आहे का, याचा विचार पाच न्यायमूर्तींचे पीठ करेल. त्यानंतर हे प्रकरण आधीच्या आठ न्यायमूर्तींच्या पीठाकडेेेे सोपवायचे, की त्यापेक्षा मोठ्या पीठाकडे सोपवायचे, याचा निर्णय पाच न्यायमूर्तींचे पीठ घेईल, असे न्या. खेहर व न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. आता पुढील सुनावणी 18 व 19 जुलै रोजी होणार असून गोपनीयतेच्या अधिकारासह आधारशी संबंधित सर्व मुद्द्यांवर दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडता येणार आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: