Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यात्रेकरूंवरील हल्ल्यात पाकच्या दहशतवाद्यांचा सहभाग
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: mn1
‘तोयबा’चा कमांडर इस्माईलच्या शोधासाठी मोहीम तीव्र
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यात चार दहशतवाद्यांचा सहभाग होता. त्यामध्ये दोन पाकिस्तानी तर दोन स्थानिक दहशतवादी होते, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी दिली. ‘लष्कर-ए-तोयबा’चा दक्षिण काश्मीरमधील कमांडर आणि पाकिस्तानी दहशतवादी अबू इस्माईल हा या हल्ल्याचा सूत्रधार असून त्याच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम तीव्र केली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी याबाबतची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली आहे, असे या अधिकार्‍यांनी सांगितले. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी दोन मोटरसायकलींचा वापर केला. पोलिसांनी जोरदार गोळीबार सुरू केल्यानंतर त्या मोटरसायकलींवरून दहशतवाद्यांनी पळ काढला. गुजरातमध्ये नोंदणी असलेली ही बस 7 जुलै रोजी जम्मूत पोहोचली. तेथील सुविधा केंद्रात या बसची अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी झाली. सुरुवातीला ही बस अमरनाथ यात्रेच्या अधिकृत ताफ्यात होती. या ताफ्यासह या बसने बलतालपर्यंतचा प्रवास केला. या बसमधील यात्रेकरूंनी 8 जुलै रोजी अमरनाथ येथील गुंफेचे दर्शन घेऊन यात्रा पूर्ण केली. त्यानंतर या बसने श्रीनगरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. त्यातील यात्रेकरूंनी श्रीनगरमध्ये दोन दिवसांचा मुक्काम केला. सोमवारी (दि. 10) ही बस दुपारी 4.30 च्या सुमारास श्रीनगरकडून काटराकडे रवाना झाली. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर खानबालपासून 10 कि.मी. अंतरावर बसचा टायर पंक्चर झाला. त्यावेळी यात्रेकरूंनी रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलमध्ये जेवण केले.
बस पुन्हा सुरू होऊन काही अंतरावर गेल्यानंतर रात्री 8.17 च्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. गोळीबार सुरू असूनही चालक सलीम शेखने धाडसाने बस वेगात पुढे नेली. मात्र, 75 मीटर अंतरावर आणखी दोन दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. त्यावेळीही शेखने बस न थांबवता पुढे नेत काही कि.मी. अंतरावर पोलीस चेकपोस्टजवळ थांबवली. तेथील पोलिसांनी यात्रेकरूंना अनंतनाग येथील पोलीस वसाहतीत नेऊन जखमी यात्रेकरूंवर प्राथमिक उपचार केले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍याने दिली. त्यामुळे ही बस अधिकृत ताफ्यात नव्हती, हा सुरक्षा दलांचा दावा निखालस खोटा ठरला आहे. 
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर बशीर लष्करी यालाही या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. या घटनांचा बदला घेण्यासाठी अबू इस्माईलने अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा कट रचला असावा. इस्माईल हा गेली काही वर्षे काश्मीर खोर्‍यात सक्रिय असून साधारण एक वर्षापूर्वी त्याने आपला तळ दक्षिण काश्मीरमध्ये हलविला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ‘तोयबा’चे एक मोड्युल उद्ध्वस्त करून उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या हिंदू दहशतवाद्याला अटक केली होती. त्याच दिवशी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला.
‘तोयबा’ने मात्र या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. अनंतनाग येथील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही कोणत्याही धर्माच्या यात्रेकरूंवर हल्ला करत नाही. ते इस्लामच्या शिकवणीविरुद्ध आहे, अशी प्रतिक्रिया देत ‘तोयबा’चा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवी याने साळसूदपणाचा आव आणला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: