Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महानगरपालिका हद्दीतून जाणार्‍या महामार्गालगतच्या दारुविक्रेत्यांना दिलासा
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : महापालिकांच्या हद्दीतून जाणार्‍या महामार्गांलगत असलेल्या दारुविक्रेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शहरांमधून जाणार्‍या महामार्गालगतच्या दारू दुकाने, परमिट रूम व बिअर बार यांच्यावरील बंदी न्यायालयाने उठवली आहे. चंदीगड प्रशासनाच्या अध्यादेशाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
देशातील महामार्गांलगत 500 मीटर अंतरापर्यंतच्या दारू विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. त्यानंतर दारुविक्रेत्यांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. या बंदीच्या निर्णयाला बगल देण्याासाठी चंदीगड प्रशासनाने शहरातून जाणार्‍या महामार्गांची नावे बदलून ‘मेजर डिस्ट्रिक्ट रोड’ करण्याचा आदेश दिला हेता. त्यावरून ‘अराईव्ह सेफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेनं पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली. चंदीगड प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देण्यासाठी 16 मार्च रोजी अध्यादेश प्रसिद्ध करून राज्य महामार्गाची नावे बदलली. प्रशासनाचा हा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश जे. एस. खेहेर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. एल. एन. राव यांच्या खंडपीठाने महापालिका क्षेत्रातील महामार्गांवरील दारूबंदी रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
या निर्णयामुळे आता महापालिकांच्या हद्दीतून जाणार्‍या महामार्गालगतच्या दारुविक्रेत्यांवरील निर्बंध उठवण्यात आल्याने देशातील प्रमुख शहरांमधील दारुविक्रेत्यांना आता दारुविक्री करता येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: