Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात 12 टक्के शेतीवर दुबार पेरणीचे संकट
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: mn2
दुबार पेरणीसाठी बियाणे, खते सरकार देणार
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बारा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून येत्या तीन-चार दिवसांत पाऊस पडला नाही तर राज्यातील 10 ते 12 टक्के जमिनीवर दुबार पेरणी करावी लागेल, अशी भीती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकर्‍यांना खते आणि बियाणांचे मोफत वाटप करणार असल्याचे फुंडकर यांनी स्पष्ट केले.
यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला होता. राज्यात खरीप पिकांचे (ऊस वगळून) क्षेत्र सरासरी 139.64 लाख हेक्टर असून 7 जुलैपर्यंत 84.18 लाख हेक्टर म्हणजे 60 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये भात, सोयाबीन आणि तुरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते; परंतु पाऊस बेपत्ता झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे सांगितले. येत्या तीन-चार दिवसांत पावसाने जोर धरला नाही तर शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळणार असून त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये थोड्या जास्त प्रमाणात पडत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात सर्वाधिक पाऊस धुळे जिल्ह्यात (28 टक्के) पडल्याची नोंद झाली आहे. 
त्यापाठोपाठ जळगाव 26 टक्के, अमरावती 42 टक्के, नागपूर 31 टक्के, भंडारा 35 टक्के, सांगली 36 टक्के, कोल्हापूर 27 टक्के, अकोला 26 टक्के, तर चंद्रपूरमध्ये 37 टक्के पाऊस पडला आहे. कमी पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने तेथे पंचनाम्याचे आदेश दिल्याचे फुंडकर यांनी सांगितले. दुबार पेरणीसाठी सरकार शेतकर्‍यांना मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाच्या अनियमिततेमुळे संकट ओढवल्यास कोणती उपाययोजना करायची यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याची माहितीही कृषिमंत्र्यांनी दिली.
21 जुलै रोजी पाहणी दौरा
पावसाने ओढ दिल्याने 12 जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या जिल्ह्यांमध्ये शेतीची परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त यांच्यासह कृषिमंत्री फुंडकर स्वत: या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ज्या शेतकर्‍यांना महामंडळाकडून बियाणांचे वाटप केले आहे, पण ती बियाणे रुजलीच नसल्याची तक्रार आली आहे, या तक्रारींची दखल घेऊन त्या बियाणांची तपासणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती फुंडकर यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: