Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिल्लक मालावर सुधारित ‘एमआरपी’ सक्तीची
ऐक्य समूह
Saturday, July 08, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: na1
उल्लंघन केल्यास एक लाखापर्यंत दंड
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : देशभरात 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात येण्यापूर्वी शिल्लक असलेल्या मालावर ‘जीएसटी’नंतर लागू झालेली सुधारित कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) न छापल्यास संबंधित उत्पादकांना 1 लाखांपर्यंतचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल, असा इशारा केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिला आहे. ग्राहकांच्या हितासाठी ‘जीएसटी’नुसार उत्पादनांवर सुधारित ‘एमआरपी’चे लेबल लावणे सक्तीचे आहे, असे पासवान यांनी सांगितले.
जीएसटीनुसार शिल्लक मालावर नवीन किंमत छापून त्याची सप्टेंबरपर्यंत विक्री करण्यास उत्पादकांना परवानगी देण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मंत्रालयाने समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर जीएसटीशी संबंधित शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन्सची संख्या 14 वरून 60 करण्यात आली आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी शिल्लक असलेल्या मालावर असलेल्या एमआरपीसह जीएसटीनुसार सुधारित एमआरपीची छपाई करून त्याची विक्री सप्टेंबरपर्यंत करण्यास उत्पादकांना परवानगी देण्यात आली आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर काही वस्तूंच्या किंमती कमी तर काहींच्या वाढल्या आहेत. त्यामुळे एमआरपीत बदल झाला आहे. हा शिल्लक माल सुधारित एमआरपीची छपाई केल्यानंतर विक्री करता येणार आहे. ग्राहकांना वस्तूंच्या नवीन किंमतींबाबत माहिती व्हावी यासाठी शिल्लक वस्तूंवर जुन्या एमआरपीसह नवीन एमआरपीची लेबल्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पासवान यांनी सांगितले. 
या नियमाचे उल्लंघन झाल्यास पहिल्या वेळी 25 हजार रुपये, दुसर्‍या वेळी 50 हजार रुपये तर तिसर्‍या वेळी 1 लाख रुपये आणि तुरुंगवासाची शिक्षा होईल, असा इशाराही पासवान यांनी दिला. शिल्लक मालावरील सुधारित किमतीची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाला देणे आणि ग्राहकांच्या हितासाठी त्याची जाहिरात करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: