Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
15 जुलैपासून हेल्मेट सक्ती
ऐक्य समूह
Saturday, July 08, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: lo1
सातार्‍यात वाहतूक शाखेकडून दवंडी पिटून निर्णय जाहीर
5सातारा, दि. 7 : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात 15 जुलैपासून दुचाकीस्वारांना हेल्मटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील हेलमेट सक्तीचा निर्णय नागरिक स्वीकारणार का, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. शहरातही हेलमेट सक्ती करण्याच्या निर्णयाला  जनतेतून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचा आदेश राबवण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ अधिकारी स्तरावर सुरु होती. अखेर सातारा वाहतूक विभागाच्यावतीने शुक्रवारी दुपारी जीप या वाहनाद्वारे शहरात ठिकठिकाणी उद्घोषणा करण्यात आली, की दि. 15  जुलैपासून राज्य, राष्ट्रीय तसेच शहरातील सर्व रस्त्यांवर दुचाकीवरुन प्रवास करणार्‍यांनी हेल्मेट वापरावे. अन्यथा, वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकांनी रस्त्यावर वाहन चालवत असताना स्वयंशिस्त पाळून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत हांडे यांनी केले.
महामार्गावर हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकीस्वारांवर एकट्या सातारा वाहतूक विभागाने कारवाई केली. या कारवाईत गेल्या महिन्यात 551 वाहन चालकांकडून 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहेे. याशिवाय बेकायदा वाहतुकीसह विविध प्रकारच्या कारवाईमध्ये 10 लाख 12 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये एकूण 3 हजार 585 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यापासून वाहतूक विभागाने हेल्मेट सक्ती करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. हेल्मेट बंदीचा यापूर्वीही प्रयत्न झाला आहे. मात्र राज्यात कुठेही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही सर्वप्रथम पोलिसांना हेल्मेट सक्तीचे केले. काही दिवस पोलिसांनी हेल्मेट घातले. मात्र नंतर त्यांनी हेल्मेट सक्ती धुडकावून लावल्याचा इतिहासही ताजा आहे.  सध्या महामार्गावर दुचाकीवरुन जाणार्‍या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्याची सक्ती पोलिसांकडून करण्यात आली आहे. जे हेल्मेट वापरत नाहीत त्यांना 500 रुपयांचा दंड करण्यात येत आहे. महामार्गावर सुरू झालेली ही हेल्मेट सक्ती आता शहरात आली आहे. सातार्‍यात त्याचे स्वागत कसे होतेय हे पाहिले पाहिजे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: