Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंड्या धाराशिवकरवर आणखी दोन सावकारीचे गुन्हे
ऐक्य समूह
Friday, July 07, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: lo2
दोन साथीदारांना अटक; खंड्यासह अन्य साथीदार फरार
5सातारा, दि. 6 : सातारा शहरातील बेकायदेशीर खासगी सावकारी करणार्‍या प्रमोद ऊर्फ खंडू बाळासाहेब धाराशिवकर आणि त्याच्या साथीदारांवर आणखी दोन सावकारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मे महिन्यात पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु आहे. या प्रकरणी  महमद कचूर शेख (रा. कोयना सोसायटी) आणि प्रमोद मोरे या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहर आणि जिल्ह्यात बेकायदेशीर खासगी सावकारी फोफावली आहे. परंतु तक्रारदार पुढे येत नसल्याने पोलिसांना कारवाई करणे अवघड जात होते. मे महिन्यात प्रमोद ऊर्फ खंडू बाळासाहेब धाराशिवकर यांच्याविरोधात खासगी सावकारीचा गुन्हे दाखल झाला. त्यानंतर त्यांच्यावर एका पाठोपाठ गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचअंतर्गत त्याच्यावर आणि साथीदारावर आणखी गुन्हे दाखल झाले आहेत.
यात पहिली फिर्याद शरद नारायण फडतरे (वय 32, व्यवसाय चहा, वडापाव, रा. भूविकास बँकेचे मागे, 10 धनलक्ष्मी बिल्िंडग, दौलतनगर, सध्या रा. विठ्ठल विश्‍व अपार्टमेंट, दत्त मंदिराच्यामागे, दौलतनगर, सातारा) यांनी दिली आहे. त्यात त्यांनी व्यवसायासाठी 12 लाख रुपये घेतले होते. परंतु प्रमोद ऊर्फ खंडू धाराशिवकरने त्यांच्याकडून वेळोवेळी सुमारे 53 लाख 30 हजार रुपये तसेच 82 हजार रुपयांची पॅजो व्हेस्पा मोटरसायकल (नं. एम.एच.42-ए.जी. 0632) आणि एम.ई.टी. (नं. बी.ए.ए. एस.एच.015425) ही वाहने वारंवार धमकावून बळकावली. त्याचप्रमाणे 6 लाख रुपये किमतीचा ट्रक (क्र. एम.एच.04, सी.जी. 4641), 5 लाख 54 हजार रुपये किमतीची इंडिका कार ही वाहने मारहाण करुन जबरदस्तीने नेल्याचे म्हटले आहे. 
त्याचप्रमाणे आरोपीने आई-वडिलांना लाथा, बुक्क्याने मारहाण करुन पूर्ण कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे मारहाणीनंतर  आई उषा नारायण फडतरे ही मरण पावल्याचेही म्हटले आहे. त्यावरुन प्रमोद ऊर्फ खंड्या
धाराशिवकर (रा. विकासनगर), सागर प्रकाश मोहिते, प्रशांत धाराशिवकर, सचिन पंडित, योगेश पंडित, अजित ऊर्फ कुबड्या कुरणे, जमीर बालेखान मुल्ला, लाला पंडित, हाजी इनामदार, तन्वीर अशरफ शेख, साळुंखे (पूर्ण नाव माहिती नाही), अमोल देशमुख तसेच 5 ते 6 अनोळखी इसमांवर दरोडा, बेकायदा सावकारी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी फिर्याद अमीर हुसेन शेख (वय 34, व्यवसाय- मार्केटिंग, रा. भोसलेवस्ती, हल्ली रा. गोरखपूर, पिरवाडी) यांनी दिली
असून त्यात 2 लाख रुपये प्रमोद ऊर्फ खंडू धाराशिवकर
याच्याकडून घेतले होते ते वेळेत परत न दिल्याने प्रमोद ऊर्फ खंडू धाराशिवकर व त्याच्या साथीदाराकडून राहत्या घरातून मारहाण करत आर.टी.ओ. ऑफिसजवळ आणले व त्याठिकाणी ट्रान्स्फर
फॉर्मवर सह्या घेऊन 5 लाख 80 हजार रुपये किमतीची इनोव्हा (एम.एच.23 ई 6999) ही कार परस्पर विकून त्याची विल्हेवाट लावल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी प्रमोद ऊर्फ खंडू धाराशिवकर, महमद कचूर शेख (रा. कोयना सोसायटी), प्रमोद मोरे तसेच 3 अनोळखी इसम यांच्यावर दरोडा आणि बेकायदा सावकारीचा
गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील महमद शेख आणि प्रमोद
मोरे यास अटक करण्यात आली असून अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: