Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

लंडनमधले अग्नितांडव
vasudeo kulkarni
Friday, June 16, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: ag1
ग्रेट ब्रिटनची राजधानी लंडनमधल्या भर मध्यवस्तीतली चोवीस मजली उत्तुंग इमारत अग्नीच्या तांडवात पूर्णपणे भस्मसात झाल्याची घटना, जगालाही हादरा देणारी ठरली आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये इमारतींच्या बांधकामांच्या नियमांची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जाते. उंच इमारतींच्या सुरक्षिततेसाठी आणि संकटकाळात लोकांचे जीवित सुरक्षित रहावे, यासाठीही अशा इमारतीत संकटकालीन मार्ग, अग्निशामक यंत्रणाही असते. अशा स्थितीत लंडनच्या उत्तर कॅसिंग्टन भागातल्या लाटिमर मार्गावर असलेली 42 वर्षांपूर्वी बांधली गेलेली चोवीस मजली ‘ग्रेनफेल टॉवर’ ही इमारत अग्नीच्या तांडवात पूर्णपणे भस्मसात झाली. ग्रेट ब्रिटनच्या वेळेनुसार मंगळवार रात्री एकच्या दरम्यान चौथ्या मजल्यावरच्या एका सदनिकेला आग लागली. काही वेळातच या इमारतीचे चोवीसही मजले आगीच्या ज्वाळांनी लपेटले गेले. संपूर्ण इमारतच चारी बाजूंनी ज्वाळांनी घेरली गेल्याने, अग्निशामक दलाला या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांची सुटका करतानाही ज्वाळा आणि धुरांचा सामना करावा लागला. काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या चाळीस बंबांनी या इमारतीला लागलेली आग शमवायसाठी झुंंज सुरू केली आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीच्या तांडवात अडकलेल्या बहुतांश रहिवाशांची आपल्या प्राणांची बाजी लावून सुटका करण्यात यश मिळवले. पण तरीही या अग्नितांडवात 12 जणांचे बळी गेले आणि 80 जण होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाच्या बंबांच्या शिड्यांवरून या पेटत्या इमारतीची आग आटोक्यात आणायचा प्रयत्न सुरू झाला. पण या शिड्या चोविसाव्या मजल्यापर्यंत पोहोचतच नसल्याने, खालच्या बाजूच्या सातव्या-आठव्या मजल्यापर्यंतच अग्निशामक दलाच्या बंबाच्या पाण्याचे फवारे पोहोचत होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोटच्या लोट या भागात आकाशात उंच उंच दिसत होते. सारे लंडनच या अग्नितांडवाने घाबरले. स्वयंसेवी संस्थांनी तातडीने पोलीस आणि अग्निशामक दलाला मदतीची शर्थही केली. चोवीसाव्या मजल्यापर्यंत जिन्यांच्या पायर्‍यांवरून पोहोचताना आणि खाली उतरताना अग्निशामक दलाचे जवान आणि रहिवाशीही गुदमरून गेले. काही लोकांनी आगीने वेढलेल्या खिडक्यातून उड्या मारल्या. तर काही रहिवाशांनी आपल्या मुलांना खिडक्यातून खाली फेकले. या आगीच्या तांडवाने वेढल्या गेलेल्या या उंच इमारतीतल्या रहिवाशांच्या, बालकांच्या आणि महिलांच्या टाहो आणि किंकाळ्यांनी हा परिसर शोकाकुल झाला होता. तब्बल बारा तासानंतर या इमारतीची आग आटोक्यात आली असली, तरी अद्यापही ती धुमसतेच आहे. संपूर्ण इमारत आगीत भस्मसात तर  झालीच, पण ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळायचाही गंभीर धोका निर्माण झाला असल्याने, ब्रिटन सरकारने या परिसरातली सुरक्षा व्यवस्था अधिकच वाढवली आहे. ब्रिटनचे नागरिक अत्यंत शिस्तप्रिय कायद्याचे काटेकोर पालन करणारे आणि या देशातले पोलीस-अग्निशामक दल संकटावर तातडीने मात करण्यात कुशल, तरबेज असतानाही, ग्रेनफेल टॉवरची आग मात्र तातडीने आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. अग्निशामक दलाने आणि पोलिसांनी जलद गतीने संकटात सापडलेल्या या इमारतीतल्या रहिवाशांची सुटका केली नसती, तर प्राण हानी प्रचंड झाली असती.       

साक्षात मृत्यूशी झुंज
अग्नीच्या तांडवात पूर्णपणे भस्मसात झालेल्या ‘ग्रेनफेल टॉवर’चे बांधकाम 1974 मध्ये झाले होते. या चोवीस मजली इमारतीत 120 सदनिका होत्या आणि संपूर्ण इमारतीत 600 लोक राहत होते. अवघ्या दोनच वर्षांपूर्वी एक कोटी पौंड खर्चून या इमारतीची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आले होते. ही इमारत धोकादायक असल्याचा इशारा स्वयंसेवी संस्थांनी दिला होता. पण असे काही घडेल आणि आपल्यावर मृत्यूचे संकट अचानक कोसळेल, असे या इमारतीतल्या रहिवाशांनाही वाटले नव्हते. पण दुर्दैवाने तसे घडले. इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या सदनिकेत लागलेली आग बघता बघता चोविसाव्या मजल्यापर्यंत आणि त्या खालच्या मजल्यापर्यंत पोहोचली. संपूर्ण इमारतीलाच आग लागली. रात्रीच्या वेळी या इमारतीतले बहुतांश रहिवाशी गाढ झोपेत असल्याने, त्यांना नेमके काय घडले हे समजलेच नाही. पण आपली इमारतच चारी बाजूंनी आगीने धडाडून पेटत असल्याचे पाहताच, साक्षात मृत्यूचा घालाच आपल्यावर आल्याची जाणीव त्यांना झाली आणि वाचवायसाठी हे लोक जीवाच्या आकांताने टाहो फोडायला लागले. एवढ्या मोठ्या अग्नीच्या तांडवातून जे लोक सुरक्षित वाचले, ते खरोखरच नशीबवान होत. त्यांचे दैव बलवत्तर असल्यानेच, ते जिवंत राहिले आहेत. या महाभयानक अग्नितांडवाच्या घटनेने जगाला 11 ऑक्टोबर 2001 रोजी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमधल्या विश्‍वव्यापार केंद्राच्या जुळ्या इमारतीवर विमाने धडकावून केलेल्या महासंहाराची आठवण आली असेल. विमाने धडकल्यावर, या दोन्ही उत्तुंग इमारतींना आग लागली आणि काही वेळातच पत्त्याच्या बंगल्यासारख्या या इमारती बघता बघता कोसळल्या, भुईसपाट झाल्या होत्या. त्या हल्ल्यात दोन हजार निरपराध्यांचे बळी गेले होते, तर सहा हजार लोक जखमी झाले होते. त्या इमारतीतल्या शेकडो लोकांनी जीव वाचवायसाठी खिडक्यातून उड्या घेतल्याने, त्यांचे प्राणही गेले होते. 1974 मध्ये ‘टॉवरिंग इन्फर्नो’ हा हॉलिवूडचा चित्रपट उंच इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या कथानकावर आधारित होता. ती कथा काल्पनिक होती. तो चित्रपट थरारक होता. न्यूयॉर्कमधल्या दहशतवादी हल्ल्याने तो महाभयानक थरार प्रत्यक्ष अनुभवला. लंडनमध्येही तसाच थरार या टॉवरला लागलेल्या आगीने जगाने पुन्हा एकदा अनुभवला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, बंगळुरू, यासह भारतातल्या अनेक महानगरात वीस-पंचवीस मजली उंच उंच इमारती बांधलेल्या आहेत. पुण्यासह अन्य शहरातही अलीकडे उंच इमारतींच्या मोठ्या वसाहती बांधल्या गेल्या आहेत. अशा इमारतीतल्या रहिवाशांवर आगीचे संकट आल्यास, त्यांची सुटका करायसाठी भारतातली अग्निशामक यंत्रणा पूर्णपणे सक्षम नाही. उंच इमारतींना आग लागल्यास, शेवटच्या मजल्यापर्यंत पाण्याचा मारा करायसाठीची यंत्रणा देशातल्या अग्निशामक दलांना सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यायला हवी, हाच लंडनच्या अग्नितांडवाचा धडा आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: