Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

चतुर बनिया
vasudeo kulkarni
Wednesday, June 14, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: ag1
महात्मा गांधीजी हे चतुर बनिया होते, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केल्याने, पुरोगामी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. छत्तीसगड राज्यातल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना शाह यांनी म. गांधीजी हे चतुर बनिया होते, त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करायचा सल्ला दिल्याचा उल्लेख केला. शाह यांनी गांधीजींचा बनिया असा केलेला उल्लेख राजकीय हितलाभासाठीच असला, तरी त्यामुळे गांधीजींची महानता आणि श्रेष्ठत्व काही कमी होत नाही. ते युगपुरुष होते, त्यामुळेच त्यांच्या निर्वाणानंतरही त्यांचे विचार अजरामर राहिले. त्यांच्या सत्याग्रहाच्या शस्त्रानेच जगातल्या अनेक हुकूमशाही राजवटी उलथल्या गेल्या. ज्या दक्षिण आफ्रिकेत त्यांनी भारतीय आणि आशियाई वंशाच्या नागरिकांना सामाजिक समतेचे न्याय्य हक्क मिळावेत, यासाठी सत्याग्रह आणि शांततापूर्ण आंदोलने केली, त्याच राष्ट्रातली गोर्‍यांची वंशवादी राजवट नेल्सन मंडेला यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनामुळेच संपली. जगावर प्रभाव टाकणार्‍या गेल्या शतकातल्या शंभर महान व्यक्तीत गांधीजींचे स्थान आहे. गांधीजी चतुर बनिया होते, असे म्हटल्याने त्यांचे मोठेपण कमी होत नाही. पण, शाह हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असल्यानेच त्यांच्या या वक्तव्याबद्दल गांधीजींचे नातू राजमोहन गांधी आणि इतिहासाचे अभ्यासक रामचंद्र गुहा यांच्यासह पुरोगामी विचारवंत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली, तीही मतलबीच आहे. खुद्द गांधीजींनी आपल्या जीवनात काही वेळा आपण बनिया असल्याचे सांगितले, लिहिले होते. पण त्याचे संदर्भ तेव्हाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी संबंधित होते. त्या उल्लेखाचा सध्याच्या राजकीय परिस्थितीशी संबंध जोडता येणार नाही आणि शाह यांच्या या वक्तव्याचा तथाकथित अर्थ  प्रतिगामी विचारसरणीशी जोडता येणार नाही. पण, भाजप हा प्रतिगामी पक्ष असल्याचा टाहो फोडत गांधीजींचे नाव किंवा त्यांच्या जीवनाचा-विचारांचा अभ्यास करायची मिरासदारी काँग्रेस पक्षाला आणि पुरोगाम्यांनाच असल्याचा दावाही मुळीच योग्य नाही. गांधीजी हे सर्व भारतीयांचे नेते होते. जगातल्या शोषितांना त्यांनी आपल्या कृतिशील शांततापूर्ण आंदोलने आणि राजकारणाद्वारे मुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचे हे कार्य महान ठरल्यानेच ते जगालाही वंद्य ठरले. अशा स्थितीत गांधीजी फक्त आपलेच आणि त्यांच्या विचारांचे वारसदार फक्त आपणच अशा मिजाशीत शाह यांच्या वक्तव्यावर तुटून पडणार्‍या तथाकथित विचारवंतांना आपण भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीयांना बहाल केलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कावरही आक्रमण करत आहोत, याचे भान नसल्यानेच हा नवा वाद निष्कारण सुरू झाला. म. गांधीजींनी बिहारमधल्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यायसाठी चंपारण्यमध्ये केलेल्या पहिल्या सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली. पण, त्या ऐतिहासिक घटनेची मात्र खुद्द काँग्रेस आणि पुरोगाम्यांनाही आठवण राहिलेली नाही. गांधीजींच्या नावाचा जयजयकार करीत सत्तेचे स्वार्थांध राजकारण करणार्‍या काँग्रेसच्याच नेत्यांनी गांधीजींच्या सामाजिक आणि राजकीय विचारांना केव्हाच तिलांजली दिली आहे. त्यांना गांधीजी हवे आहेत, ते फक्त लोकांना भुलवून सत्ता मिळवायसाठीच!  

विचारांचा वारसा
म. गांधी हे दिल्लीहून पालनपूरला जात असताना अमिरगडमध्ये नबाब तेली मोहमंद खान त्यांना भेटले. त्यांनी गांधीजींना शेळीचे दूध आणि फळे दिली. गांधीजींचे त्या दिवशी मौन असल्याने खान यांनी त्यांच्याकडून पाटीवर तीन प्रश्‍न लिहून उत्तरे मागितली. गांधीजींनी एकाच प्रश्‍नाचे उत्तर दिले आणि लिहिले, ‘तुमने मुझे दो चीजे दि, फल और दूध! तो तुम मुझसे तीन सवाल कैसे पूछ सकते हो? और तुम मुझे इतनी असानीसे मूर्ख  बना नही सकते।’ या उल्लेखाबरोबरच सत्याचे प्रयोग या आत्मकथेतही त्यांनी आपण बनिया असल्याचा उल्लेख केला आहे. गांधीजींनी स्वत:बद्दल केलेले हे उल्लेख राजकीय कारणासाठी नाहीत. गांधीजींनी आयुष्यात कधीही संपत्ती जमवली नाही. ते नंगे फकीर राहिले. आपल्या मुलाबाळांसाठीही त्यांनी काही जमवले नाही आणि ठेवलेही नाही. साधा पंचा हाच त्यांचा जीवनाच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत वेश होता. देशातल्या दीनदुबळ्या गोरगरिबांना शोषणातून मुक्ती मिळावी, त्यांना न्याय हक्क मिळावेत, यासाठीच त्यांनी सामाजिक आंदोलनेही केली. त्यांच्याच स्वातंत्र्यलढ्यातल्या त्यांच्याच नेतृत्वाने स्वातंत्र्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचली. 1942 मधल्या काँग्रेसच्या चलेजाव चळवळीत ब्रिटिशांनाही भारतीय जनतेच्या एकजुटीचा आणि गांधीजींच्या नेतृत्वाचा साक्षात्कार झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवणे हे गांधीजींचे ध्येय होते आणि ते साकार होत असताना, फाळणीच्या वेदनांनी हा महामानव दु:खी झाला होता. गांधीजींना भारत अखंडच स्वतंत्र व्हायला हवा होता. पण, काँग्रेसमधल्या तेव्हाच्या नेत्यांना फाळणी मान्य होती. कारण त्यांना सत्ता हवी होती. समाजवादी नेते राममनोहर लोहिया, यांनी ‘अंतहिन यात्रा’ या पुस्तकात स्वातंत्र्यानंतर गांधीजी एकाकी कसे पडले होते, याचे अभ्यासपूर्ण वर्णन केलेले आहे. स्वातंत्र्याचा सोहळा राजधानी दिल्लीत साजरा होत असताना, हा महामानव मात्र नोआखलीमध्ये फाळणीनंतर उसळलेल्या जातीय दंगली शमवायसाठी एकाकीपणे झुंजत होता. काँग्रेसच्या नेत्यांना गांधीजींच्या आदेशाचा एवढा आदर असता, तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी तेव्हाच काँग्रेसचे विसर्जन केले असते. पण, तसे केले असते, तर काँग्रेसला देशाची सत्ता मिळाली नसती. शाह यांनी तेव्हाच्या परिस्थितीला अनुसरून गांधीजी काय म्हणाले, हे सांगितल्याने शाह काही प्रतिगामी ठरत नाहीत. तेही राजकारणातल्या क्षेत्रातले ‘चतुर’ बनियाच आहेत. पण, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही काँग्रेसला आणि पुरोगाम्यांना म. गांधीजींच्या कृतिशील विचारांचे वारसदार फक्त आपणच आहोत, असे वाटत असल्यानेच त्यांनी शाह यांच्यावर टीका सुरू केली आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे गांधीजींच्या विचारांचे मुख्य सूत्र सत्ता मिळताच काँग्रेस-वाल्यांच्या लक्षातही राहिले नाही. गेल्या 20/25 वर्षात तर याच काँग्रेसमधल्या काही स्वार्थी-संधिसाधू नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करीत शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता-संपत्ती जमवली. लक्षावधी कोटी रुपयांचे घोटाळे केले. जनतेची फसवणूक केली. हे सारे वास्तव शाह यांचा निषेध करून कसे नाकारता येईल?
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: